Big Breaking | तुकाराम मुंडेच्या खात्याची ‘आपला बझार’ वर सर्जिकल स्ट्राईक

कुडाळात खळबळ ; ग्राहकांना काढले बाहेर, चौकशी सुरू

कुडाळ | कुणाल मांजरेकर 

राज्यात भल्याभल्यांना जेरीस आणलेल्या तुकाराम मुंडे यांच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पथकाने आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळवला आहे. घाटमाथ्यावरील राजकीय वरदहस्त वापरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉलचे जाळे विणणाऱ्या आपला बझार डिपार्टमेंटल स्टोअरच्या कुडाळ येथील शाखेवर अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. यावेळी आतील ग्राहकांना बाहेर काढून हा मॉल बंद करत तपासणी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते आपला बझारच्या कुडाळ शाखेचे शाखेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. या कारवाईमुळे कुडाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते अत्यंत दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात कुडाळ येथील ‘आपला बझार’ या भव्य मॉलचे उदघाटन झाले होते. आज अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पथकाने याठिकाणी थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, FSSAI चे पथक आज अचानक मॉलमध्ये धडकले. अधिकाऱ्यांनी आत पाऊल टाकताच सर्वात आधी मॉलमध्ये खरेदी करत असलेल्या ग्राहकांना तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर मॉलचे मुख्य दरवाजे बंद करून आतमध्ये चौकशीचा धडाका सुरू करण्यात आला.

सध्या पथकाकडून मॉलच्या व्यवस्थापनासह संपूर्ण स्टाफची कसून चौकशी केली जात असून, अन्नपदार्थांचे परवाने, साठा आणि कायदेशीर कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे.

error: Content is protected !!