नारायण राणेंना दिलासा ; जामीन मंजूर

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर हे दोन दिवस गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार असून भविष्यात असा गुन्हा घडणार नाही, अशी आत घालण्यात आली आहे. 

नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर राणेंना रात्री महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावली आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिक रित्या केलं होतं. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलंय. तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर कलमं लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. तसंच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही, असा युक्तीवादही करण्यात आला. तसंच राणेंच्या प्रकृतीचं कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!