वाढदिवसाच्या औचित्याने जलसंवर्धनाची भेट; विशाल परब थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारणार; वेतोरेत पहिल्या बंधाऱ्याचे काम सुरू

वेंगुर्ले : वाढदिवसाचा दिखाऊ उत्सव न करता तो जलसंवर्धनाच्या लोकचळवळीत रूपांतरित करण्याचा संदेश देत महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिला वनराई बंधारा उभारला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याच्या महाअभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी वेतोरे-गुरव टेंबवाडी येथे करण्यात आला.

येत्या १५ ऑक्टोबर रोजी विशाल परब यांचा वाढदिवस साजरा होत असून कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन वाढदिवस साजरा न करता भविष्यातील संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जलसंधारणाला गती देण्याचा निर्धार विशाल परब यांनी या अभियानातून केला आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

वाढदिवसाचा उत्सव नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर जलसंधारणाचा संकल्प

विशाल परब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिल्या वनराई बंधाऱ्याच्या कामात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी परिसरातील शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावरच न्याहारी करत त्यांनी ग्रामीण भागाशी असलेली आपुलकी अधोरेखित केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून जलसाठा निर्माण करण्याबरोबरच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जलसंकटावर आत्तापासूनच उपाययोजना

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून भूजल पुनर्भरणाला चालना देणे, हा या अभियानाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी गावपातळीवर जलसंधारणाची कामे उभी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

वेतोरे येथील शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, सदानंद गिरप, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, वेतोरा सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष बाळा सावंत, शैलेश जामदार, समीर कुडाळकर, सुधीर गावडे, विरोचन धुरी, दीपक करंगुटकर, आबा येरम, सूर्याजी नाईक, विक्रम सावंत, ताता गावडे, श्री. वेतोरकर, प्रशांत नाईक, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, सुनील गडेकर, सुनील घाग यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, तरुण, भाजप कार्यकर्ते आणि जलसंधारण क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा सोहळा न करता शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी जलसंधारणाची प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

error: Content is protected !!