संघटीतपणे लढा दिल्यानेच यश ; भविष्यातही गटबाजी न करता एकत्र या

कंत्राटी कामगारांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात कामगार नेते अशोक सावंत यांचे आवाहन

कुडाळ : आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेल्यास यश दूर नाही. अन्यायाच्या विरोधात आपण प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. महावितरण कामगारांवर अन्याय झाला, त्यावेळी आम्ही संघटितपणे लढा दिला व यशस्वी झालो. भविष्यात सर्वांनी गटबाजी न करता एकत्र यावे, असे प्रतिपादन वीज कंत्राटी कामगारांचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी कंत्राटी वीज कामगार यांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना केले.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघचे सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशन संघटनेचे राज्य नेते सागर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी राज्य पातळीवरील नेते सत्यविजय जाधव, गोपाळ कुलकर्णी, कृष्णांत बच्चेपाटील, केंद्रीय कार्यकारणी सदस्य संभाजी उर्फ आनंद लाड, जिल्हा अध्यक्ष संदीप बांदेकर, दिनेश तांबे, मोहन गावडे, सचिन राघव, सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, महेश राऊळ तसेच महानिर्मिती महापारेषण महावितरण विभागात काम करणारे जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते 

यावेळी बोलताना श्री. सावंत म्हणाले, कोणतेही यश मिळवायचे असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही. गेली कित्येक वर्षे आम्ही हा लढा लढत असताना एकाच वेळी साडेपाचशे वीज कंत्राटी कामगारांचा प्रश्न आमचे नेते खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला होता. भविष्यात जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी एका छताखाली येणे काळाची गरज आहे. आता तक्रारी नको कामे करा असा सल्ला देत सर्वांनी आपली ओळख वाढवा असे आवाहन केले 

सागर पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे असेल तर संघटित लढा फार महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला कोणते उपदेश देण्यासाठी आलो नाही तर आपली संघटना अधिक भक्कम कशी होईल यासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यावेळी कंत्राटी कामगारांचा काळ कसा होता आणि सद्यस्थिती काय आहे याबाबतही मार्गदर्शन करताना आमचा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ हा कंत्राटी कामगारांसाठी चालवली जाणारी एक चळवळ आहे आणि ही चळवळ आम्ही अविरत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्यविजय जाधव यांनी संघटना वाढली पाहिजे सदस्य झाले पाहिजेत सर्व कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी एकजूट महत्वाची आहे असे सांगितले. केंद्रीय कार्यकारणी सदस्य आनंद लाड यांनी या ठिकाणी असणाऱ्या आपल्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय पातळीवर सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असून माझ्यावर सदस्य पदाची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार असल्याचे सांगितले तर नूतन जिल्हा अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना येथील कंत्राटी कामगारांचे जे प्रश्न आहेत ती समजून घेऊन तळागाळातील प्रत्येक कंत्राटी कामगार हा येणाऱ्या नवीन योजना किंवा नवीन पगारवाढीबाबत त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. यावेळी केंद्रीय कार्यकारणींवर निवड झालेले माजी जिल्हाध्यक्ष आनंद लाड तसेच नूतन जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर व त्यांची टीम यांचा मान्यवराच्या सत्कार करण्यात आला 

error: Content is protected !!