मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना ‘आदर्श तालुकाध्यक्ष’ पुरस्कार प्रदान

जिल्हा व्यापारी संघाच्या देवगड येथील मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्यानिमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारातील महत्वाचा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना शनिवारी देण्यात आला. देवगड येथे झालेल्या जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर हे मागील २५ वर्षांपासून मालवण व्यापारी संघाचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत आहेत. २०००, २००८, २०१६, २०२४ या सलग चार मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. कुशल संघटक व सर्वांना सोबत घेऊन काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. संपूर्ण जिल्ह्यात फक्त मालवणमध्येच नव-युवा महिला व्यापाऱ्यांना व्यापारी संघटनेच्या कामात सहभागी करून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. वर्षभर नियमितपणे व्यापारी वर्षा अभ्यास सहल, व्यापारी एकता वनभोजन, युवा व्यापाऱ्यांची एकदिवसीय एकता सहल, नारळी पौर्णिमा उत्सव, दीपावली उत्सव, विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. व्यापारी संघातर्फे नियमितपणे सभासद नोंदणी व बैठकांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक एकता मेळाव्यात मालवणच्या व्यापाऱ्यांची विक्रमी उपस्थिती ठेवण्यात महत्वाचे योगदान श्री. नेरूरकर हे देत असतात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने त्यांना आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार जाहीर केला होता.

शनिवारी देवगड येथे झालेल्या व्यापारी एकता मेळाव्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व अ‍ॅप्लॉईड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे चेअरमन रामभाऊ भोगले, आय-४१ इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक महेश चव्हाण, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, उपाध्यक्ष संजय भोगटे, सागर शिरसाट, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर, स्वागताध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सचिव संजय मेस्त्री, देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे तसेच इतर तालुक्यातील व्यापारी संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!