मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख आणि जिल्हा प्रवक्तेपदाचा त्याग; आमदार निलेश राणेंकडे सुपूर्द केले पत्र
मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजेंद्र उर्फ राजा गावकर यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच, राजीनाम्याची प्रत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडेही सादर केली आहे.
राजा गावकर यांनी राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणांमुळे सध्या राजकारणासाठी आवश्यक तेवढा वेळ देणे शक्य होत नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता या दोन्ही पदांचा आपण स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने आपल्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्यांना योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या जबाबदाऱ्यांसाठी अपेक्षित वेळ देणे शक्य नसल्याने अन्य सक्षम आणि योग्य व्यक्तीस या पदांवर काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे गावकर यांनी पत्रात नमूद करुन आपला राजीनामा पक्षाने स्वीकारावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.