इन्सुलीत उद्या रंगणार रानभाजी महोत्सव; पाककला स्पर्धेत महिलांना आकर्षक बक्षिसांची मेजवानी!

सौ. वेदिकाताई परब यांच्याहस्ते होणार उदघाटन : आकर्षक बक्षीसांची लयलूट

इन्सुली : रानभाज्यांची समृद्ध परंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचा संदेश देणाऱ्या रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिकाताई परब यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार असून, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर प्रमुख वक्ते, तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरवजी मुळीक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सचिन दळवी, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगांवकर, मुळदे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, डॉ. रणजीत देव्हारे, सहाय्यक विस्तारतज्ज्ञ डॉ. गिरीष उईके, सहाय्यक प्राध्यापक डॉ. जया वाघ व डॉ. निलिमा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पाककला स्पर्धेत बक्षिसांची लयलूट!

रानभाज्यांपासून विविध चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या पाककला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक कुकर, द्वितीय क्रमांकासाठी विद्युत प्रवर्तन, तृतीय क्रमांकासाठी समई, चतुर्थ क्रमांकासाठी कुकर, तर पाचव्या क्रमांकासाठी इस्त्री देण्यात येणार आहे. याशिवाय महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

रानभाज्यांच्या समृद्ध परंपरेला मिळणार व्यासपीठ

या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व, आरोग्यदायी गुणधर्म, पारंपरिक पाककला आणि कोकणच्या खाद्यसंस्कृतीतील त्यांचे स्थान याबाबत जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून महिला व ग्रामीण कुटुंबांना स्वावलंबनाची दिशा देण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे.

रानभाज्यांची चव, पारंपरिक पदार्थांची मेजवानी आणि पाककलेतील महिलांचा उत्साह अनुभवण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!