धो… धो… धो…डाला! शब्दांच्या मैदानात विशाल परब यांची तुफानी बॅटिंग!

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी

विनोद राऊळ आणि ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील मिश्किल भाष्याने हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट!

सावंतवाडी : सावंतवाडी येथील शरीरसौष्ठवाच्या मैदानात स्पर्धकांनी आपल्या पीळदार देहयष्टीचे सामर्थ्य दाखविले, मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनीही उपस्थितांची मने जिंकली. आपल्या खास मिश्किल शैलीतील वक्तृत्वाने त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली. निमित्त होते भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आणि भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात आयोजित ‘भाजपा श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे!

सामान्यतः व्यासपीठावर अवघ्या दोन-तीन मिनिटांत मनोगत व्यक्त करून इतरांना बोलण्याची संधी देणारे विशाल परब यावेळी मात्र तब्बल नऊ मिनिटे उपस्थितांशी संवाद साधत राहिले. त्यांच्या भाषणात आत्मविश्वास, विनोदबुद्धी, ज्येष्ठांप्रती आदर, सहकाऱ्यांविषयीचा सन्मान आणि विकासाबाबतच्या अपेक्षा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. प्रत्येक विधानातील अचूक टायमिंग आणि मिश्किल शैलीमुळे उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त दाद दिली.

‘एक घाव दोन तुकडे’ नव्हे, तब्बल ४५ तुकडे! विनोद राऊळांवरील टिप्पणीने हास्यकल्लोळ

भाषणातील सर्वाधिक रंगतदार प्रसंग ठरला तो भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या उल्लेखाचा. निवेदकांनी विनोद राऊळ यांची तुलना ‘गदर’ चित्रपटातील सनी देओल यांच्या दमदार भूमिकेशी करत ‘एक घाव दोन तुकडे’ असा उल्लेख केला होता. हाच धागा पकडत विशाल परब यांनी आपल्या खास शैलीत भन्नाट टोला लगावला. ते म्हणाले, “सन्माननीय निवेदकांना आणि उपस्थित बंधू-भगिनींना मी सांगू इच्छितो की, विनोद राऊळ साहेब म्हणजे एक घाव दोन तुकडे करणारे नव्हेत, तर तब्बल ४५ तुकडे करण्याची ताकद असलेले नेते आहेत! त्यांच्या आशीर्वादाचा आणि आमच्या पाठीवर असलेल्या हाताचा आधार आम्हाला भल्याभल्यांना समोरासमोर भिडण्याचे बळ देतो.” त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उसळला. टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

‘नायक’ चित्रपटाचा संदर्भ देत अनिल निरवडेकरांना विकासाचे आव्हान!

यानंतर विशाल परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचाही आपल्या खास शैलीत गौरवपूर्ण उल्लेख केला. “अनिल निरवडेकर साहेब म्हणजे केवळ अभिनेता अनिल कपूर नव्हेत, तर ‘नायक’ चित्रपटातील एका दिवसात मुख्यमंत्री बनलेल्या अनिल कपूर यांच्याप्रमाणेच सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. पुढील चार वर्षांत शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास घडविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते या संधीचे सोने करतील, अशी अपेक्षा आहे,” असे सांगत त्यांनी निरवडेकर यांना शुभेच्छा दिल्या. चित्रपटातील लोकप्रिय प्रसंगांचा संदर्भ, स्थानिक नेतृत्वाचा गौरव आणि शहराच्या विकासाबाबतच्या अपेक्षा यांची सांगड घालत त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.

युवकांसाठी नवी व्यासपीठे उभारण्याचा संकल्प; दोडामार्गातही शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानस!

यावेळी बोलताना विशाल परब यांनी सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या स्पर्धेच्या आयोजनामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

सिंधुदुर्गातील युवकांना त्यांच्या कला, क्रीडा, कौशल्य आणि सामर्थ्याला वाव देणारी अधिकाधिक व्यासपीठे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षीही अशाच भव्य स्वरूपात शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात दोडामार्ग तालुक्यातही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

शरीरसौष्ठवाचा थरार अन् वक्तृत्वाचा जल्लोष!

या दिमाखदार सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपाचे नगरसेवक-नगरसेविका, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील नागरिकांनीही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी केले, तर आभारप्रदर्शन नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केले.

एकीकडे शरीरसाधकांच्या पीळदार देहयष्टीचा थरार, दुसरीकडे क्रीडाप्रेमींचा उत्साह आणि त्यात विशाल परब यांच्या नऊ मिनिटांच्या भाषणातील अचूक टायमिंग व मिश्किल फटकेबाजी, अशा वातावरणात ‘भाजपा श्री २०२६’चा सोहळा रंगतदार ठरला. शरीराच्या मैदानात स्पर्धकांनी आपले सामर्थ्य दाखविले, तर शब्दांच्या मैदानात विशाल परब यांनी आपल्या वक्तृत्वाची छाप उमटवली. त्यामुळे शरीरसौष्ठव स्पर्धेइतकीच चर्चा रंगली ती विशालभाईंच्या तुफानी बॅटिंगची!

error: Content is protected !!