
रस्ते खड्डेमुक्त करण्यापासून विसर्जन व्यवस्था, पार्किंग, वाहतूक नियंत्रण अन् सुरक्षेपर्यंत जय्यत तयारी
मालवण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भाविकांना आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मालवण नगरपरिषदेने सर्वंकष नियोजन केले आहे. रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, विसर्जन स्थळे, वाहतूक नियंत्रण, पार्किंग तसेच आपत्कालीन यंत्रणा अशा विविध पातळ्यांवर प्रशासन सज्ज झाले आहे.
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी नगरपरिषद सभागृहात आज विशेष बैठक पार पडली. नगराध्यक्षा ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
खड्ड्यांवर ‘अॅक्शन’
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा नगरसेवकांनी बैठकीत तीव्रतेने मांडला. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवार रात्रीपासून खड्डे बुजविण्याचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत, गणेशोत्सवापूर्वी मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले.
अनधिकृत बॅनरबाजीवर पालिकेचा दणका
विनापरवानगी बॅनर व पोस्टर्स लावण्याच्या प्रकारावरही मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी कठोर भूमिका घेतली. बॅनर लावणाऱ्याचा पत्ता किंवा ओळख मिळाली नाही, तर संबंधित बॅनर ज्या प्रिंटिंग प्रेसमधून छापण्यात आला, त्या प्रेस मालकावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
धोकादायक वीज वाहिन्यांचा सर्व्हे
शहरातील धोकादायक अवस्थेतील विद्युत तारा व वाहिन्यांमुळे गणेशोत्सवात दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने तातडीने सर्व्हे करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.बाजारपेठेतील गर्दीवरही नियोजनगणेशोत्सव काळात बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुख्य बाजारपेठेतील फळविक्रेत्यांना उत्सवाच्या काळात पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.
मोकाट कुत्र्यांवर गणेशोत्सवानंतर कारवाई
मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवाचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी दिली.
शहरातील बहुतांश रस्त्यांचे एप्रिल-मे महिन्यात डांबरीकरण करण्यात आले असून, उर्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत कापण्याची मोहीम ५ ऑगस्टपासून सुरू असून १२ सप्टेंबरपर्यंत ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डास प्रतिबंधक फवारणीही जूनपासून नियमित सुरू आहे.
२२ विसर्जन स्थळे सज्ज
गणेश विसर्जनासाठी शहरात एकूण २२ विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. दीड दिवसापासून दहा दिवसांपर्यंतच्या विसर्जनासाठी हॅलोजन लाईट्स व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चिवला बीच, बंदर जेटी आणि दांडी बीच येथे जीवरक्षक तैनात असतील. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवरील गाळ काढणे आणि पायऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने विविध ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून नागरिकांनी निर्माल्य त्यातच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अग्निशमन वाहन सज्ज
आगीची किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी नगरपरिषदेचे अद्ययावत अग्निशमन वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे. हायमास्ट आणि स्ट्रीट लाईट्सच्या दुरुस्तीची कामेही सुरू असून, महावितरणशी समन्वय साधून अखंडित वीजपुरवठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१३ ते २५ सप्टेंबर विशेष पार्किंग व वाहतूक नियोजन
गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेऊन १३ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष पार्किंग व वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. भरड येथील पार्किंग नागरिकांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत सागरी महामार्गावर खासगी बस, ट्रक व अवजड वाहनांसाठी पार्किंग; नाट्यगृह आवारात खासगी वाहनांसाठी पार्किंग; बांगीवाडा येथे सहा आसनी रिक्षा, टेम्पो व कार पार्किंग; सारस्वत बँकेच्या एका बाजूला मोटारसायकल पार्किंग; मशीद गल्लीमध्ये सायकल पार्किंग; जेटी परिसरात अतिरिक्त रिक्षांसाठी पार्किंग अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच सुबोध मेडिकल ते भाजी मार्केट रस्ता तीन आसनी रिक्षा व हातगाड्यांसाठी, हॉटेल सागर किनारा रस्ता एका बाजूला रिक्षा थांब्यासाठी, तर सारस्वत बँक परिसरात रिक्षा थांब्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. राणे मेडिकल ते नेरूरकर गल्लीसह काही मार्गांवर वाहनांना निर्बंध राहणार असून, बॉम्बे टेक्स्टाईल्स परिसरात सायकलींसाठी प्रवेश ठेवण्यात आला आहे. धक्का जेटी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. भरड नाका ते स्टेट बँक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग बंदी राहणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या, अकराव्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशीला दुपारी ३ नंतर सोमवार पेठ रस्त्यावरून वाहने आणि एसटी बसेसचा प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहात पार पडण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी आणि रिक्षा व्यावसायिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.







Subscribe to my channel






