Malvan | दांडीत डेंग्यूची धास्ती; महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर मैदानात…!

प्रभाग ९ मध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची सतर्कता ; गल्लीबोळांसह साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी औषध व धूर फवारणी

मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील दांडी परिसरात डेंग्यूचे काही रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत स्थानिक नगरसेविका तथा पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने पुढाकार घेत नगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सक्रिय केले. त्यांच्या उपस्थितीत दांडी परिसरात धूर फवारणीसह कीटकनाशक औषध फवारणीची मोहीम राबविण्यात आली.

डेंग्यूच्या रुग्णांची माहिती समोर आल्यानंतर वेळ न दवडता अन्वेषा आचरेकर यांनी आरोग्य पथकासोबत प्रत्यक्ष परिसराची पाहणी केली. डासांची उत्पत्ती होण्याची संभाव्य ठिकाणे, साचलेले पाणी, गल्लीबोळ तसेच नागरिकांच्या घरांच्या आसपासच्या परिसराची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.

डासांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी ‘अ‍ॅक्शन मोड’!

नगरपालिकेच्या आरोग्य पथकाकडून दांडी परिसरात धूर फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर डासोत्पत्तीची संभाव्य ठिकाणे शोधून आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. घरोघरी जाऊन नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

‘एक दिवस कोरडा’ ठेवण्याचे आवाहन

जुने टायर, नारळाच्या करवंट्या, तुटलेली भांडी, कुंड्या किंवा अन्य वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात तसेच आठवड्यातून एक दिवस घर व परिसरातील साचलेले पाणी पूर्णपणे काढून टाकून ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा अंगावर पुरळ यांसारखी लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी विलंब न करता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

दांडीत डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची यंत्रणा सक्रिय झाली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गती वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेल्या तातडीच्या फवारणी मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!