मालवण बाजारपेठेत रात्रीची कचरा गाडी सुरू ; सौरभ ताम्हणकर यांच्या मागणीला अखेर मूर्त रूप

आ. निलेश राणे, नगराध्यक्षा ममता वराडकर, भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांचे ताम्हणकर यांनी मानले आभार

महायुतीचे मनोमिलन लवकर व्हावे आणि या सरकारकडून कामांचा असाच धडाका पाहायला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त

मालवण : मालवण शहराचा वाढता विस्तार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठ परिसरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने पालिकेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पालिकेकडून रात्रीच्या वेळेत कचरा संकलन सुरु करण्यात आले असून, यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

या निर्णयाबद्दल आमदार निलेश राणे तसेच मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर व भारतीय जनता पार्टी गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांचे सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले आहेत. महायुतीचे मनोमिलन लवकर व्हावे आणि या सरकारकडून कामांचा असाच धडाका पाहायला मिळावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. असे निर्णय मालवणचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदतीचे ठरणार असून, पर्यटकांनाही स्वच्छ आणि सुंदर मालवणचा अनुभव घेता येईल अशी अपेक्षा सौरभ ताम्हणकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे व्यक्त केली आहे.

मालवण हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. येथील विलोभनीय समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी दरमहा लाखो पर्यटक मालवणला भेट देत असतात. विशेषतः मालवण मच्छी मार्केट आणि बंदर जेटी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सौरभ ताम्हणकर यांनी १५ जानेवारी २०२४ रोजी मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी नमूद केले होते की, केवळ सकाळी स्वच्छता मोहीम राबवून ही समस्या सुटणार नाही. जोपर्यंत कचरा टाकणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही आणि त्यांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, तोवर स्वच्छतेचा हेतू साध्य होणार नाही. त्यांनी पत्रात खालील प्रमुख मागण्या केल्या होत्या. रात्री १० नंतर बाजारपेठेत कचरा गाडी फिरवण्यात यावी, कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, वारंवार घाण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली होती.

सौरभ ताम्हणकर यांच्या या मागणीची आणि निवेदनाची दखल घेत मालवण नगरपालिकेने अखेर रात्रीच्या वेळी कचरा संकलन करणारी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आता रात्री १० वाजेनंतर बाजारपेठेत फिरणार असून, व्यापारी आणि हॉटेल चालक आपला कचरा थेट या गाडीत देऊ शकणार आहेत. यामुळे रस्त्यावर कचरा फेकला जाण्याचे प्रमाण कमी होणार असून मच्छी मार्केट परिसरातील दुर्गंधीपासून नागरिकांना सुटका मिळणार आहे.

error: Content is protected !!