
पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा; दोन कोटींच्या प्रकल्पात वाचनालय, सभागृहासह विविध सुविधा
वैभववाडी : पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळगावी हेत येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम पुढील १२ महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा स्मारक उभारणीमागील मुख्य उद्देश असल्याचे राणे यांनी सांगितले. सुर्वे यांच्या जीवनप्रवासासह कष्टकरी आणि उपेक्षित समाजाचे वास्तव त्यांच्या कवितांमधून कसे व्यक्त झाले, याची माहिती स्मारकात उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, भालचंद्र साठे, विविध लोकप्रतिनिधी, सुर्वे कुटुंबीय, अधिकारी आणि हेत ग्रामस्थ उपस्थित होते.
स्मारक परिसरात वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह, कार्यालय, बाहेरील बाजूस बहुउद्देशीय व्यासपीठ आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. स्मारकाचे काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. स्मारक उभारल्यानंतर त्याची स्वच्छता, दुरुस्ती आणि देखभाल नियमितपणे होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा संबंधित यंत्रणांपैकी देखभालीची जबाबदारी कोणाकडे असेल, याची स्पष्ट व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.
उद्घाटनाला नारायण राणे, आशिष शेलार, उदय सामंत उपस्थित राहणार
स्मारकाच्या उद्घाटनासाठी खासदार नारायण राणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची घोषणा नितेश राणे यांनी केली. स्मारक पूर्ण झाल्यानंतर या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. आमदार असताना भालचंद्र साठे यांनी स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. निधीच्या मर्यादेमुळे यापूर्वी कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. आता शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने प्रकल्पाला चालना मिळाल्याचे राणे यांनी सांगितले.
‘दोन दिवस’ कवितेतील सामाजिक जाणीवेचा उल्लेख
भाषणादरम्यान नितेश राणे यांनी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेतील ओळी सादर करून त्यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन केले. कष्टकरी जीवनातील संघर्ष आणि भाकरीसाठीची धडपड यांचे वास्तव सुर्वे यांच्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.







Subscribe to my channel






