“भराडी देवी नमो नमः” च्या जयघोषाने आंगणेवाडी नगरी दुमदुमली

मालवण : कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या यात्रेचा मुख्य सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाला. “श्री देवी भराडी माते की जय”, “भराडी नमो नमः” च्या जयघोषाने संपूर्ण आंगणेवाडी नगरी दुमदुमून गेली होती. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आई भराडीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा जनसागर लोटला असून लाखो भाविकांनी आईच्या चरणी नतमस्तक होत कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली.

यात्रेच्या मुख्य दिवशी मध्यरात्री ३ वाजल्यापासूनच विधीवत पूजेनंतर दर्शनाला आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटेच्या गारव्यातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रेल्वे, एसटी बसेस आणि खासगी वाहनांच्या माध्यमातून मुंबईकर चाकरमानी आणि राज्यभरातील भाविक दाखल झाले होते. भाविकांच्या सोयीसाठी आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळाने चोख नियोजन केले होते. विशेषतः मालवण आणि कणकवली अशा दोन्ही बाजूंनी मिळून ९ स्वतंत्र रांगांची व्यवस्था केल्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता आले. तसेच अपंग आणि अतिमहनीय व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती.

यात्रेनिमित्त भराडी मातेचा गाभारा अत्यंत मनमोहक फुलांनी सजवण्यात आला होता. देवीला भरजरी साडी आणि सोन्याच्या पुरातन दागिन्यांनी मढवण्यात आले होते. संपूर्ण मंदिर परिसरावर केलेली विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. ज्या भाविकांना केवळ मुखदर्शन घ्यायचे होते, त्यांच्यासाठी ग्रामस्थ मंडळाने स्वतंत्र खिडकीची सोय केल्याने दर्शनाचा वेग वाढला होता.

आंगणेवाडीची यात्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून राजकीय नेत्यांसाठीही ते श्रद्धेचे केंद्र आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांनी आई भराडीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले. यात पालकमंत्री नितेश राणे, आमदार आशिष शेलार, दीपक केसरकर, वरूण सरदेसाई, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह मुंबईतील शिवसेना, भाजप, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक, अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी आणि सिने कलावंतांनी हजेरी लावली.

परिसरात राजकीय पक्षांचे कक्ष, स्वागत कमानी आणि बॅनर्सची मोठी गर्दी दिसून आली. सकाळच्या सत्रात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. भराडी देवीला नवस बोलणे आणि फेडण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. अनेकांनी आपली वजनाइतकी साखर, गूळ किंवा अन्य वस्तूंचा ‘तुलाभार’ करून देवीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. मंदिर परिसरातील भव्य बाजारपेठेत गृहोपयोगी वस्तू, मालवणी मिठाई (खाजे), खेळणी आणि आकाशपाळण्यांचा आनंद लुटण्यासाठी मुलांसह मोठ्यांनी गर्दी केली होती. महिला बचत गटांनी लावलेल्या स्टॉल्सनाही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साध्या वेशातील पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात होते. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३ किमी अंतरावरच भव्य वाहनतळाची सोय करण्यात आली होती. मालवण, कणकवली, कुडाळ यासह जिल्हाभरातील विविध आगारांतून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाने जागोजागी प्रथमोपचार केंद्र उभारून भाविकांची सेवा केली. रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता. भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवत यंदाची आंगणेवाडी यात्रा पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरली आहे.

error: Content is protected !!