बांधकाम कामगारांना मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार मिळणार
भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश
मालवण : बांधकाम मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये देण्याच्या मंडळ निर्णयास शासनाने मान्यता दिली असून, भारतीय मजदूर संघाने केलेल्या मागणीला यश आल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये देण्याची मागणी सन २०१९ पासून भारतीय मजदूर संघातर्फे बांधकाम मंडळ व शासन पातळीवर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने बांधकाम मंडळाकडुन बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी ५१ रुपये हजार देण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजूर साठी सादर केला होता. दोन वर्षे होऊनही या मागणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी देण्यात येत नव्हती. या विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलने, निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेला. नुकत्याच सांगली येथे पार पडलेल्या बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अधिवेशनात याबाबत ठराव पास करुन मंडळास व शासनास पाठविण्यात आला होता. व तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. भारतीय मजदूर संघाच्या सततच्या मागणीचा रेटा व आंदोलनाचा इशारा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठीच्या धुळ खात पडलेल्या प्रस्तावाला मंजुरी देणे भाग पडले आहे. हे बांधकाम कामगार व भारतीय मजदूर संघाच्या संघटीत लढ्याचे यश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.याच बरोबर बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे शव मुळ गावी नेण्यास व बांधकाम कामगारांना अपघातात हात किंवा पाय गमवावा लागल्यास त्यास कृत्रिम अवयव जोडण्यासाठीही आर्थिक मदत मिळणार असल्याची माहीती हरी चव्हाण यांनी दिली.