“आभाळमाया” ग्रुपचं आभाळा एवढं दातृत्व ; कॅन्सरग्रस्त अक्षयला २.४२ लाखांची मदत !

मित्रा लवकर बरा हो… सावरवाडच्या मैदानावर मित्रांसोबत खेळताना तुला पुन्हा पाहायचंय

कुणाल मांजरेकर

मालवण : अक्षय श्रीकृष्ण फाटक … वय वर्ष २१, रा. वराड, ता. मालवण… क्रिकेटच्या मैदानात खेळणारा, बागडणारा हा युवक… वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्याला ग्रासलं … गोव्याच्या बांबुळी हॉस्पिटलमध्ये केलेल्या तपासणीत हा आजार निष्पन्न झाल्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आणि आता नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्याच्या उपचारासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या निधीची पूर्तता करण्यासाठी समाजातील विविध घटकांतून मदतीचं आवाहन करण्यात आलंय. त्याला प्रतिसाद देत “आभाळमाया” या व्हाट्सअप ग्रुपने पुढाकार घेऊन तब्बल २ लाख ४२ हजार १९० रुपयांचा निधी जमा केला आहे. या निधीचा धनादेश सोमवारी अक्षयचे वडील श्रीकृष्ण फाटक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. “मित्रा लवकर बरा हो… सावरवाडच्या मैदानावर मित्रांसोबत खेळताना आणि खेळून झाल्यावर मनमोकळेपणाने मस्तीखोरपणे गप्पा मारताना तुला पुन्हा पाहायचंय”, असा संदेश “आभाळमाया” ने अक्षयला दिला आहे. आभाळमाया परिवाराच्या या दातृत्वाचं कौतुक होत आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या वराड – सावरवाड येथील अक्षय फाटक या युवकाला वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. दोन महिन्यांपूर्वी गोवा बांबुळी येथे या आजाराचे निदान झाल्यानंतर या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याला उपचारासाठी सर्वात अगोदर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर त्यानंतर आता नानावटी रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचारासाठी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ६० लाखांची गरज आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलासाठी एवढी रक्कम येणार कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर समाज माध्यमांतून आवाहन करून हा निधी जमा करण्याचं ठरविण्यात आलं. ही बाब मालवण – कट्टा येथे नव्यानेच सुरू झालेल्या “आभाळमाया” या व्हाट्सएप ग्रुपपर्यंत पोहोचली. त्यानंतर या ग्रुपचे ऍडमीन राकेश डगरे यांनी या ग्रुपवरून १९ ऑक्टोबरला सदस्यांना मदतीचं आवाहन केलं. आणि अवघ्या एका महिन्याच्या आत अक्षयच्या मदतीसाठी तब्बल २ लाख ४२ हजाराचा निधी जमा झाला. या रक्कमेचा धनादेश सोमवारी अक्षयच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला.

प्रिय अक्षय…. “आभाळमाया” कडून संदेश

“कधी कधी नियतीच्या मनात काय असतं ना हे कुणीही सांगु शकत नाही.. आयुष्यात तुझ्यावर आलेला प्रसंग कुणावरही येऊ नये..
पण तुझ्या कुटुंबावर हा जो आघात आला आहे आणि त्याचा तु आणि तुझे कुटुंबीय ज्या प्रकारे सामना करत आहात हे आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणात्मकच आहे, यासाठी की, कठीण काळात देखील प्रसंगाशी कसे सामोरे गेलं पाहीजे..!
तुझी तब्येत लवकरात लवकर बरी होऊन सावरवाडच्या क्रिकेट मैदानावर तुझ्या मित्रांसोबत तुला खेळताना आणि खेळुन झाल्यावर मनमोकळेपणानं मस्तीखोर गप्पा मारताना तुला बघायची आमची ईच्छा आहे..
त्यासाठी देव तुला लवकर बरे करो, हीच आमची ग्रामदैवत श्री देव वेताळ आणि लाडक्या गणपती बाप्पा चरणी प्रार्थना..

अद्यापही दात्यांची गरज !I

अक्षयच्या आजाराबाबत माहिती मिळाल्यानंतर “आभाळमाया” ग्रुपच्या वतीने सदस्यांना आम्ही मदतीचं आवाहन केलं. त्याला सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने २ लाख ४२ हजारांची रक्कम आम्ही जमा करून मदतीचा धनादेश अक्षयच्या वडिलांना सुपूर्द केला आहे. अक्षयला उपचारासाठी अजून मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. त्यामुळे अजूनही कोणाला अक्षयला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या अकाउंट नंबरवर निधी पाठवावा किंवा अक्षय संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास “आभाळमाया” ग्रुपचे ऍडमीन राकेश डगरे (मो.नं. 09987762896) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन “आभाळमाया” ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

Akshay Shrikrishna Phatak
Account:- No. 20298112319
IFSC:- SBIN0012213

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!