मालवणात २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन ; पर्यटन वाढीवर होणार विचारमंथन
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे आयोजन
केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. सुरेश प्रभू ऑनलाईन मार्गदर्शन करणार
पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते उदघाटन ; आ. नितेश राणे, परशुराम उपरकर यांची उपस्थिती
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सोमवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कोळंब येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये जिल्ह्याच्या पर्यटन वाढीवर विचारमंथन होणार आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारत सरकारचे शेर्पा खा. सुरेश प्रभू ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार परशुराम उपरकर हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
मालवण येथील हॉटेल रुचिरा येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहर अध्यक्ष मंगेश जावकर, महिला आघाडी प्रमुख मेघा गावकर आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित चर्चासत्रात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक व्हिकटर डॉन्टस, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, पत्रकार सागर चव्हाण यांच्यासह भारत सरकारच्या वतीने श्री. व्यंकटेशन उपस्थित राहणार आहेत. या पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनाच्या थीम वर केक बनविणे स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांचा सत्कार तसेच महासंघाने गेल्या दोन महिन्यात विविध प्रशिक्षणे घेतली त्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे वाटप करण्यात येणार आहेत. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी गावोगावाचे सरपंच तसेच ग्रामपंचायतींची मदत घेण्यात येत आहे. गावागावातील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पर्यटन विकास आराखडा बनवून देण्याची विनंती करण्यात आली असून या कामी स्वायत्त संस्थांचीही मदत घेण्यात येत आहे, असे श्री. मोंडकर म्हणाले.