वडिलांच्या स्मृतींना ‘सेवेची ओंजळ’; प्रीतम गावडेंनी जपला माणुसकीचा वारसा

जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयात अन्नदान तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मालवण : काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, मात्र त्यांनी दिलेले संस्कार, माणुसकीची शिकवण आणि सेवाभाव त्यांच्या पुढच्या पिढीच्या कृतीतून सदैव जिवंत राहतात. याच भावनेतून युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी वडील कै. विलास सुरबा गावडे यांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली वाहिली. वडिलांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अणाव-मयेकरवाडी येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयात अन्नदान तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

वडिलांचा स्मृतिदिन म्हणजे केवळ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस नव्हे, तर त्यांनी दिलेल्या संस्कारांना पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात जागवण्याचा दिवस… हीच भावना मनात ठेवून प्रीतम गावडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवाकार्याची परंपरा जपली.

कै. विलास गावडे यांनी आयुष्यभर जपलेला माणुसकीचा आणि सेवाभावाचा वारसा आज त्यांचा मुलगा कृतीतून पुढे नेत आहे. वडील आज सोबत नसले तरी त्यांच्या विचारांची सावली आणि संस्कारांची ऊब प्रत्येक सेवाकार्यातून अनुभवायला मिळते, अशीच या उपक्रमामागची भावना होती. दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आनंदाश्रयातील गरजूंसाठी अन्नदान करण्यात आले. यासोबतच विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या गरजांना आधार देण्यात आला. गरजूंच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हीच आपल्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली.

वडिलांची आठवण डोळ्यांत दाटून येते, पण त्यांचे संस्कार हातांना सेवेसाठी पुढे नेतात… अशा भावनेतून प्रीतम गावडे यांचे हे सेवाकार्य पुढे सुरू आहे. ‘माणसाच्या आयुष्यातील खरी श्रीमंती ही इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात आहे,’ हा विचार त्यांनी केवळ शब्दांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला. दहा वर्षांचा काळ उलटला, तरी वडिलांच्या स्मृती मनात तितक्याच जिवंत आहेत. त्यांच्या स्मृतीदिनाला सामाजिक सेवेशी जोडत प्रीतम गावडे यांनी ‘वडील शरीराने नसले तरी संस्कारांच्या रूपाने सदैव सोबत आहेत’, हा भाव आपल्या कृतीतून अधोरेखित केला.

यावेळी प्रीतम गावडे यांच्या आई प्रणाली गावडे, पत्नी वैष्णवी, बहीण प्रतीक्षा, तसेच ओंकार चव्हाण, प्रतीक गावडे, सुश्रुत गावडे आदी उपस्थित होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सेवाकार्याला भावनिक किनार लाभली. वडिलांच्या स्मृतींना अश्रू नव्हे, तर सेवेची ओंजळ अर्पण करून प्रीतम गावडे यांनी त्यांच्या संस्कारांचा वारसा जपला.

error: Content is protected !!