
मनसेचा सवाल; पालिकेला कारवाईसाठी ७ दिवसांची मुदत, अन्यथा अनोखे आंदोलन छेडणार
मालवण : मालवण शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुत्र्यांची वाढती संख्या, नसबंदी मोहिमेचा अभाव आणि कुत्र्यांच्या चाव्यांनंतर शासकीय रुग्णालयातील औषधे व इंजेक्शन्सच्या उपलब्धतेचा प्रश्न यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे टोळके वाढत असून, नागरिकांचा पाठलाग करणे, दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, लहान मुलांवर झडप घालणे आणि चावा घेण्याच्या घटना घडत असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तसेच सकाळ-संध्याकाळ नागरिकांना रस्त्यावरून वावरताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नसबंदी होतेय की फक्त कागदावर?
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी हा महत्त्वाचा उपाय असताना, मालवणमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रति कुत्रा नसबंदीसाठी निधी मंजूर होत असेल, तर हा पैसा नेमका कुठे खर्च होतोय? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पालिकेने आतापर्यंत किती कुत्र्यांची नसबंदी केली, त्यासाठी किती निधी खर्च झाला, कोणत्या संस्था अथवा कंत्राटदारामार्फत ही कामे करण्यात आली आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम काय झाले, याचा संपूर्ण तपशील नागरिकांसमोर जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात नसबंदी न करता केवळ कागदोपत्री आकडे फुगवून निधीचा गैरवापर तर होत नाही ना? याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुत्रा चावला तर उपचार कुठे?
भटक्या कुत्र्यांच्या समस्येसोबतच कुत्र्याच्या चाव्यानंतर आवश्यक असलेल्या इंजेक्शन्स आणि औषधांच्या उपलब्धतेचा मुद्दाही मनसेने उपस्थित केला आहे. मालवणच्या शासकीय रुग्णालयात ही आवश्यक इंजेक्शने अनेकदा उपलब्ध नसतात किंवा साठा संपलेला असतो, एकीकडे शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढतोय आणि दुसरीकडे चावा घेतल्यानंतर आवश्यक उपचारांचीच कमतरता असेल, तर नागरिकांनी जायचे कुठे? असा संतप्त सवालही मनसेने केला आहे.
मनसेच्या पालिकेकडे प्रमुख मागण्या
शहरातील भटक्या कुत्र्यांची तातडीने सर्वंकष गणना करावी. मोठ्या प्रमाणावर व शास्त्रोक्त पद्धतीने नसबंदी मोहीम राबवावी. आतापर्यंत झालेल्या नसबंदीची संख्या व खर्चाचा सार्वजनिक अहवाल जाहीर करावा. नसबंदीसाठी मंजूर निधीचा संपूर्ण हिशोब नागरिकांसमोर ठेवावा. नागरिक आणि विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. कुत्र्याच्या चाव्यानंतर आवश्यक औषधे व इंजेक्शने शासकीय रुग्णालयात कायम उपलब्ध ठेवावीत, अशा मागण्या मनसेने केल्या आहेत.
७ दिवसांत कार्यवाही करा; अन्यथा आंदोलन!
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी मनसेने मालवण नगरपालिकेला सात दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत नसबंदी व नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नाही, तर मनसेच्या वतीने प्रतिकात्मक दहा कुत्रे पकडून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बांधून अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे







Subscribe to my channel






