मुंबई – मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त ८ कोच जोडा

गणेशोत्सवातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्याना पत्र

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेने ज्यादा गाड्या सोडल्या असताना देखील कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई – मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला (ट्रेन क्रमांक २२२२९) अतिरिक्त ८ कोच जोडण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी त्यांच्या मूळ गावी प्रवास करतात. या काळात अपेक्षित असलेल्या मोठ्या संख्येने प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्रमांक २२२२९ (वंदे भारत एक्सप्रेस) मध्ये ८ (आठ) अतिरिक्त कोच वाढवण्याचा विचार करा. वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी, उत्सवाच्या काळात गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल. या महत्त्वाच्या उत्सवादरम्यान प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक सूचना लवकरात लवकर देण्यात याव्या, असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!