राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्णयावरून गैरसमज पसरवणाऱ्यांना आमदार निलेश राणेंचा सणसणीत टोला
‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणत हल्लाबोल; मालवणच्या किनारपट्टीसाठी न्यायालयीन निर्णयाचे सकारात्मक परिणाम दोन दिवसांत पत्रकार परिषदेत उघड करणार
मालवण : मालवणच्या सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रीय हरित लवादाने विरोधातील याचिका फेटाळल्यानंतरही काही मंडळींचा अपप्रचाराचा उद्योग थांबलेला नाही. न्यायालयात आपली बाजू टिकवता आली नाही, तरी जनतेमध्ये खोटे चित्र उभे करून संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अशा फेक नरेटिव्हला मालवणची जनता बळी पडणार नाही, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी संबंधितांना सुनावले आहे.
न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतरही त्याचा विपर्यास करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे. सत्य स्वीकारण्याची तयारी नाही आणि वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ द्यायची नाही, अशीच काहींची भूमिका दिसत आहे. त्यामुळेच ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी अवस्था झालेल्या मंडळींनी आधी न्यायालयीन निर्णय समजून घ्यावा आणि मग जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करावा, असा जोरदार टोला आमदार निलेश राणे यांनी लगावला.
विशेष म्हणजे, मालवणच्या सीआरझेड आणि किनारपट्टीच्या भवितव्याच्या दृष्टीने न्यायालयाचा हा निर्णय नेमका किती महत्त्वाचा आणि सकारात्मक आहे, याची सविस्तर माहिती येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडणार असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेत न्यायालयीन निर्णयाचे नेमके महत्त्व, मालवणच्या किनारपट्टीसाठी त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक शक्यता आणि या विषयावर जाणीवपूर्वक पसरवले जाणारे गैरसमज यांचा सविस्तर समाचार घेतला जाणार आहे.
न्यायालयाचा निर्णय काहींच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही म्हणून वास्तव बदलत नाही. निकालानंतरही फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कितीही केला, तरी वस्तुस्थिती समोर आणणारच, असा स्पष्ट संदेश आमदार निलेश राणे यांनी दिला आहे. आता या पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे नेमके कोणते मुद्दे मांडतात आणि विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे मालवणवासीयांचे लक्ष लागले आहे.





Subscribe to my channel




