दुष्काळाच्या झळा मच्छीमारांपर्यंत; मंत्री नितेश राणे थेट मराठवाड्यातील तलावांवर

शिवणाटाकळी, राजेवाडी आणि सोमठाणा तलावांची पाहणी; नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या पंचनाम्याचे निर्देश, गाळ काढण्यासह संवर्धन तलावाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर/जालना

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करत शिवणाटाकळी, राजेवाडी आणि सोमठाणा तलावांची प्रत्यक्ष पाहणी केली. तलावांमधील घटलेला पाणीसाठा, मत्स्यउत्पादनातील घट आणि मच्छीमारांच्या आर्थिक नुकसानीची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवणाटाकळी तलावाची पाणीपातळी सुमारे ३४ टक्क्यांपर्यंत घटली असून, त्याचा थेट परिणाम मत्स्यउत्पादनावर झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती घेतली.

‘दुष्काळ Trigger-1’ अंतर्गत तलावातील घटलेल्या पाणीसाठ्याचे आवश्यक मोजमाप करून पंचनामे करण्यात येणार असून, पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र मच्छीमारांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राणे यांनी दिली.

यावेळी मच्छीमारांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. तसेच महिला मच्छीमार बचत गटांनी तयार केलेल्या मत्स्यजन्य उपपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

राजेवाडी तलावासाठी गाळ काढण्याचे निर्देश

यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाची पाहणी करण्यात आली. कमी पावसामुळे तलावातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, त्याचा परिणाम स्थानिक मत्स्यव्यवसायावर झाला आहे. तलावाची पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी सिंचन व पाटबंधारे विभागाला दिले. भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित राहण्यासाठी संवर्धन तलाव उभारण्याबाबतचा प्रस्तावही तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, तलाव परिसरात मुरूम काढल्यानंतर काही ठिकाणी टाकाऊ माती किंवा गाळ तलावातच टाकला जात असल्याने तलावाची पाणीसाठवण क्षमता कमी होत असल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, असे निर्देशही देण्यात आले.

सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन ७९ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची पाहणी करताना मत्स्यउत्पादनातील मोठी घट समोर आली. अपुऱ्या पावसामुळे तलावातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, गेल्यावर्षीच्या ७९ टक्के मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा उत्पादन केवळ २० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून त्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच सोमठाणा तलावातील गाळ काढण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मच्छीमारांच्या प्रश्नांवर प्रशासनाला तातडीच्या सूचना

या दौऱ्यात तिन्ही ठिकाणी मंत्री राणे यांनी मच्छीमारांशी प्रत्यक्ष संवाद साधत पाणीसाठ्याची स्थिती, मत्स्यउत्पादनातील घट, आर्थिक नुकसान आणि शासनाकडून अपेक्षित मदत याबाबत माहिती घेतली. नुकसानाचे वस्तुनिष्ठ मोजमाप, पंचनामे आणि त्यानंतर नियमानुसार मदत यावर त्यांनी भर दिला. मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या दौऱ्यात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, स्थानिक आमदार संजना जाधव, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सहआयुक्त ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!