९ तासांच्या चौकशीनंतरही राणेंचा आक्रमक पवित्रा कायम ; दिशा आणि सुशांतची हत्याच !
कितीही वेळ चौकशीसाठी बसवून ठेवा, संधी मिळेल तिकडे आवाज उठवतच राहणार
दिशा – सुशांतच्या हत्येनंतर दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फोन ; मंत्र्यांच्या गाडीचा उल्लेख टाळण्याची केली होती सूचना
कुणाल मांजरेकर
दिशा सालीयनच्या आईच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्यावर मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मालवणी पोलीस ठाण्यात तब्बल ९ तास राणे पिता पुत्रांची चौकशी करण्यात आली. मात्र रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर देखील राणेंचा आक्रमक पावित्रा कायम असल्याचे पाहायला मिळाले. दिशा सालीयन आणि सुशांतसिंग राजपूत या दोघांची हत्याच झाली आहे. आता दिशाच्या केसची फाईल क्लोज करण्याची तयारी सुरू आहे. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. आमची कितीही तास चौकशी करा, संधी मिळेल, तिकडे दिशाच्या खुनाबाबत आवाज उठवतच राहणार, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सुशांतसिंह, दिशाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा नारायण राणेंनी यावेळी केला आहे. तुम्हालाही मुलं आहेत, असं ठाकरेंनी सांगितल्याचे राणे म्हणाले.
दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर या वक्तव्याप्रकरणी त्यांची आज चौकशी करण्यात आली. दुपारी २ वाजता पोलीस ठाण्यात गेलेले नारायण राणे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. चौकशीवेळी पोलिसांना दर १० मिनिटांना फोन येत होते. ज्यातून त्यांच्यावर वरच्या स्तरातून दबाव असल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळे माझ्याकडील पुरावे योग्यवेळी सीबीआयकडे देईन असं यावेळी राणेनी सांगून आपण अमित शाहांना फोन केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सोडलं असंही नारायण राणे यावेळी म्हणाले. सुशांतची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. सुशांतच्या केसबद्दल आणि एका मंत्र्याची गाडी होती या बद्दल बोलू नका. तुम्हालाही मुले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही सगळी ही वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळली आहे, असे राणेंनी म्हटले आहे.
दिशाच्या हत्येबाबत आम्ही वक्तव्य केल्यानंतर तिच्या आई वडिलांकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या आणि त्यांनी आमच्या विरोधात तक्रार करायला त्यांना प्रवृत्त केले. माझ्या स्टेटमेंट मध्ये मी घडलेली सर्व हकीकत मांडली आहे. आमच्यावर केस टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या दबावाला आम्ही घाबरणार नाही. कोणावरही अन्याय होत असेल तर त्या विरोधात आम्ही आवाज उठवणारच, असे नारायण राणेंनी सांगून आमच्या आयुष्यातले ५/१० तास घेतले म्हणजे खूप काही मिळवलं असं नाही. आम्ही दिशा सालीयन आणि सुशांतच्या हत्येबद्दल जिकडे संधी मिळेल तिकडे आवाज उठवणार आहोत. माझ्या मते दिशाच्या हत्येची फाईल क्लोज करण्यात येत आहे. त्यामुळे तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न या सरकार कडून होत असल्याचे राणेंनी म्हटले आहे.