
देऊळवाड्यात बंधाऱ्याची उभारणी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उत्स्फूर्त श्रमदान
मालवण : पावसातील तुटीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने जलसंधारणाच्या कामाला गती दिली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याच्या उद्देशाने रेवतळे–देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर, देऊळवाडा सागरी महामार्ग परिसरात बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.
पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, गोडे पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजलसाठ्याला बळकटी देणे, हा या बंधारा उभारणीमागील प्रमुख उद्देश आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन आणि पाणीबचतीच्या उपाययोजना आवश्यक असल्याने नगरपरिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. या परिसरात आणखी काही ठिकाणी बंधारे उभारण्याचे नियोजन असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव आणि नगरसेविका नीना मुंबरकर यांनी सहभाग घेत श्रमदान केले. नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे हातभार लावला. लोकप्रतिनिधींनी स्वतः श्रमदानात सहभागी होत जलसंधारण आणि पाणीबचतीचा संदेश दिला.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले की, संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पाणीबचत, पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यांना प्राधान्य दिले जात आहे. अशा उपाययोजनांमुळे जलसंधारणाच्या कामाला चालना मिळेल.
धामापूरमध्येही बंधारा; मालवणच्या पाणीपुरवठ्याला बळ देण्याचा प्रयत्न
मालवण शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीजवळील वहाळावरही मागील आठवड्यात बंधारा उभारण्यात आला. मालवण नगरपरिषदेच्या नळपाणी योजना विभागाच्या पुढाकारातून, तसेच धामापूर आणि काळसे ग्रामपंचायतींच्या सहकार्याने व लोकसहभागातून हे काम करण्यात आले. धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीजवळ पाणी अडविण्यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना शहराच्या जलस्रोतांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर यांनी दिली.
देऊळवाडा आणि धामापूर येथील बंधारा उभारणीच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेने पाणीबचत, जलसाठा वाढविणे आणि लोकसहभागातून जलसंधारणाला चालना देण्यावर भर दिला आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.







Subscribe to my channel






