दिवाळीच्या सुट्टीत मालवण हाऊसफुल्ल!

पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे फुलले; पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस!

मालवण | कुणाल मांजरेकर

दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा आनंद आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ! या तिन्ही गोष्टींचा संगम साधत पर्यटकांनी यंदाच्या दिवाळी सुट्टीत मालवणकडे मोठी धाव घेतली आहे. पर्यटकांच्या गर्दीने मालवण नगरी अक्षरशः गजबजून गेली असून, अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समुद्राच्या लाटा, निळाशार अथांग सागर, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि अस्सल मालवणी पाहुणचार यामुळे पर्यटकांच्या पसंतीत मालवणने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन करून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मालवणमध्ये दाखल होत आहेत. कुटुंबीयांसह सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांवर मोठी वर्दळ दिसत आहे. मालवण शहर, तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला बीच या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मांदियाळी रंगली आहे.

समुद्रसफरी अन् जलक्रीडांचा थरार!

सिंधुदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक सफर, तारकर्लीतील स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बोटिंग आणि विविध जलक्रीडा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. समुद्राच्या निळ्याशार पाण्यातील साहसी खेळांचा आनंद घेत पर्यटक दिवाळीच्या सुट्ट्या अविस्मरणीय करत आहेत. त्यातच मालवणी खाद्यसंस्कृतीतील ताजे मासे, मालवणी थाळी, सोलकढी आणि अस्सल कोकणी चवींचा आस्वाद पर्यटकांच्या पर्यटनाला वेगळीच रंगत आणत आहे.

पर्यटन व्यवसायाला दिवाळीची लॉटरी!

पर्यटकांच्या वाढत्या ओघाचा थेट फायदा स्थानिक पर्यटन व्यवसायाला होत आहे. हॉटेल्स, लॉजिंग, रिसॉर्ट्स, होमस्टे, रेस्टॉरंट्स, बोट व्यावसायिक, रिक्षाचालक आणि स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक निवासस्थानांमध्ये आगाऊ आरक्षणांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा, साहसी जलक्रीडा आणि माणुसकीने ओथंबलेला मालवणी पाहुणचार यांची जादू पर्यटकांना पुन्हा पुन्हा मालवणकडे खेचत आहे. दिवाळीच्या सुट्टीतील या गर्दीने मालवणच्या पर्यटन क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

error: Content is protected !!