आचरा आणि आडवली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची बैठक संपन्न ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड


मालवण : आचरा जिल्हा परिषद आणि आडवली जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या आगामी दौऱ्याचे नियोजन तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनपर ठराव संमत करण्यात आला. यावेळी आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकजुटीने जिंकण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, राजू परुळेकर, राजन गावकर, अन्वेशा आचरेकर, महिमा मयेकर, दीक्षा गावकर, दिव्या कोचरेकर यांच्यासह जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जोरदार स्वागत करण्याची तयारी दर्शवली. तसेच प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे नियोजन करणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या बैठकीच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्याचा निर्धार केला.

या बैठकीत भाजपचे स्थानिक नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे आणि गावागावात पक्ष पोचवण्याचे आश्वासन दिले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.

Subscribe to my channel




