मालवणात कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबीर आणि कीर्तन महोत्सव
३० एप्रिल ते ३ मे रोजी आयोजन : “वार्षिक रिंगण” आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : वारकरी कीर्तन परंपरेची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या ‘वार्षिक रिंगण’ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच वारकरी कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबिर आणि वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर आणि रिंगणचे संपादक सचिन परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. बॅ. नाथ पै सेवांगण धुरीवाडा मालवण येथे हे शिबिर होणार असून कीर्तन महोत्सव शहरातील भरड येथील श्री दत्त मंदिर येथे होणार आहे.
सेवांगण येथील संस्था कार्यालयात रविवारी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी सेवांगणचे अध्यक्ष ॲड. परुळेकर, नितीन वाळके, रुजरिओ पिंटो आदी उपस्थित होते. यावेळी ॲड.परुळेकर म्हणाले, बॅ. नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांचे श्रद्धामय आणि भक्तीमय हा बॅ. नाथ पै यांच्या प्रकृतीचा स्थायीभाव होता. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनकारांनी पाळावयाच्या मर्यादा, निरूपण करताना अभंगांच्या कडव्यातील आंतरसुसंगती, कीर्तनात गायच्या संगीत चालीचे महत्त्व अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची यातून ओळख होईल. श्री. परब म्हणाले वारकरी संतपरंपरेचा महान वारसा, वारकरी तत्वज्ञान आणि संप्रदायाचे स्वरूप, आजच्या काळात कीर्तनाची गरज, वारकरी संप्रदायातील देवाची संकल्पना, वारकरी संप्रदायातले नामस्मरणाचे महत्व, वारकरी संप्रदायातल्या प्रार्थनेचे स्वरूप, वारकरी किर्तनाची पद्धत आणि तंत्र, वारकरी संगीत आणि अभंगाच्या चाली, भजन, काकडा, हरिपाठ आणि दिंडी वारकरी प्रवचन विषय मांडणी आदींची चर्चा या शिबिरात होणार असून कीर्तन-प्रवचन नव्याने शिकण्याची इच्छा असणारे तरुण संत साहित्याची आवड आणि कुतूहल असणाऱ्यांनीही हे शिबीर उपयुक्त ठरू शकेल.
चार दिवसीय शिबिरात सचिन परब, ॲड. देवदत्त परुळेकर, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज घेरडीकर, ह. भ. प. दत्तात्रय महाराज दोन्हे, ह. भ. प. अभय महाराज जगताप, ह. भ. प स्वामीराज महाराज भिसे, अमृता मोरे देहूकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वारकरी कीर्तन महोत्सवातील कीर्तने रात्री ९.३० वाजता भरड येथील दत्तमंदिरात होतील. यात ३० एप्रिल रोजी ह. भ. प. देवदत्त महाराज परुळेकर यांचे ‘ज्ञानदेवे रचिला पाया ।’ या विषयावर कीर्तन होईल. १ मे रोजी ह. भ. प. अभय महाराज जगताप सासवड पुणे यांचे ‘नामा तयार किंकर । तेणे केला हा विस्तार ।।’ या विषयावर कीर्तन होईल. २ मे रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडकर घेरडीकर पंढरपूर यांचे ‘जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।’ या विषयावर कीर्तन होईल. ३ मे रोजी ह. भ. प. स्वामीराज महाराज आळंदी यांचे ‘तुका झालासे कळस ।।’ या विषया कीर्तन होईल.
किर्तनाला आळंदी व पंढरपूर येथील पखवाजी व टाळकरी वारकरी साथ करणार आहेत. हे वारकरी संप्रदायाचे कार्य, तत्वज्ञान व इतिहास यांचा परिचय या कीर्तनातून होईल. तरी जिज्ञासू व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. परुळेकर यांनी केले आहे.