रांगोळी महाराज मठ परिसरात वाहतुकीस अडथळा होणारा पोल हटवा

शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण यांचे दुरसंचार अधिकाऱ्यांना निवेदन

मालवण : शहरातील तारकर्ली-मालवण मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसराजवळ असलेला बीएसएनएलचा पोल आणि नादुरुस्त उपकरणे वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. हा पोल तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या मालवण नगरपालिकेतील गटनेत्या पूनम चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे दूरसंचार विभागाकडे केली आहे.

प्रभाग क्र. ४ मधील रांगोळी महाराज मठ परिसरातील मुख्य रस्त्यावर बीएसएनएलचा एक जुना पोल आहे. या ठिकाणी मोठ्या तसेच लहान वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र हा पोल थेट वाहतुकीच्या मार्गात येत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे.रस्त्यावरील पोलमुळे वाहनांच्या येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत आहे, तो तातडीने हटवावा. पोलसोबतच बीएसएनएलचे एक बंद पडलेले उपकरण गेल्या अनेक दिवसांपासून तिथेच पडून आहे ते देखील तिथून हलवण्यात यावे. मालवण हे पर्यटन स्थळ असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. हा अडथळा पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काढणे आवश्यक आहे. हा प्रश्न सर्व स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांच्या हिताचा असून दूरसंचार विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणीही सौ. चव्हाण यांनी केली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह नगरसेवक सहदेव बापर्डेकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, शेखर गाड, अमित सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!