देवा म्हाराजा… विरोधकांचे आडेवेढे बाजूक करून निलेश राणेंका मालवण – कुडाळ निवडणूकीत भरघोस मतांनी विजय मिळवून दी !
कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग राजा चरणी साकडं घातल्यानंतर आता ग्रामीण भागातही मागणी
मालवण तालुक्यात माळगाव हुमरसवाडीत ग्रामस्थांचं जागृत मांडावर साकडं
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदार संघातून आपलं नशीब आजमावणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग राजाच्या चरणी निलेश राणेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी कुडाळ- मालवण मधून निलेश राणेंच्या विजयासाठी साकडं घातलं असताना आता ग्रामीण भागातही तोच कित्ता गिरवला जातोय. निलेश राणे सध्या कुडाळ आणि मालवण तालुक्यात घरगुती गणपतींचं दर्शन घेत आहेत. या दरम्यान, माळगाव हुमरसवाडी मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी पुन्हा एकदा कुडाळ-मालवण मतदार संघातून निलेश राणेंचा भरघोस मतांनी विजय होण्यासाठी गाऱ्हाणं घातलं. यावेळी देखील स्वतः निलेश राणे उपस्थित होते. त्यामुळे भाजप कडून कुडाळ- मालवण मतदार संघातून निलेश राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जातंय.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या मालवण- कणकवली विधानसभा मतदार संघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये कुडाळ – मालवण मतदार संघ निर्माण झाला. त्यानंतर २०१४ च्या निवडणूकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव करून हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला. २०१९ च्या निवडणूकीत राणे समर्थक रणजित देसाई यांनी ऐनवेळी येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी अल्पावधीतच मिळवलेली मते दुर्लक्षित करणारी नव्हती. आता २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित असून या निवडणुकीसाठी भाजप कडून कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरचं उत्तर काही दिवसांपूर्वी कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात मिळालं आहे. येथील भाजप कार्यकर्त्यांनी निलेश राणेंच्या उपस्थितीत या मतदार संघातून निलेश राणे यांच्या विजयासाठी साकडं घातलं. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदार संघात पुन्हा “शिवसेना विरुद्ध राणे” अशी लढत रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कुडाळ मधील घटनेनंतर आता ग्रामीण भागात देखील हाच कित्ता गिरवला जात आहे. शनिवारी निलेश राणे मालवण तालुक्यात ग्रामीण भागातील गणपती दर्शन करीत असताना माळगाव हुमरसवाडी मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी तेथील जागृत मांड देवस्थाना समोर कुडाळ- मालवण मतदार संघातून निलेश राणेंच्या विजया गाऱ्हाणं घातलं. येत्या निवडणूकीत भरघोस मतांनी निलेश राणेंना निवडून द्या. ते आमदार झाल्यानंतर तुझ्या चरणी नवस फेडण्यासाठी स्वतः येतील, असं साकडं ग्रामस्थांनी घातलं आहे. यावेळी स्वतः निलेश राणे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे आता ग्रामीण भागात देखील निलेश राणेंच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.