सुप्रीम कोर्टाकडून आ. नितेश राणेंना “दिलासाच” ; माजी खा. निलेश राणेंची प्रतिक्रिया

हजर होण्यास दहा दिवसांची मुदत ; आम्ही जिल्हा न्यायालयात जाऊ

कुणाल मांजरेकर

आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हजर होण्यासाठी दहा दिवसांचा अवधी देत एकप्रकारे दिलासाच दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही जिल्हा न्यायालयात जाणार असल्याचे ते गुहागरला पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. त्यानंतर गुहागर मध्ये पत्रकार परिषदेत माजी खासदार निलेश राणे यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता न्यायालयाने नितेश राणेंना दणका नाहीतर दिलासा दिल्याचे ते म्हणाले. आज जामीन फेटाळल्यानंतर न्यायालयाने तात्काळ आ. नितेश राणे यांच्या अटकेचे आदेश दिले असते तर धक्का म्हणणे योग्य ठरले असते. पण न्यायालयाने नितेश राणे यांना हजर होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देऊन तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. आ. राणेंना जिल्हा न्यायालयात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढील न्यायालयीन लढाई जिल्हा न्यायालयात लढली जाईल, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!