मालवण बंदर जेटीवरील पारंपरिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुले करा

गेट लावून अडवणूक आणि पार्किंग शुल्क आकारणी थांबवण्याचे आमदार निलेश राणेंचे बंदर विभागाला निर्देश

मालवण (प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळाला लागून असलेले पारंपरिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुले ठेवावेत, तसेच या मार्गांचा वापर करणाऱ्या स्थानिकांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश आमदार निलेश राणे यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बाजाराकडील आणि सागर किनारा हॉटेलकडील बंद करण्यात आलेले मार्ग खुले करून स्थानिक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळाच्या जागेत गेट बसवून पारंपरिक मार्ग बंद करण्यात आल्याने स्थानिक मत्स्य व्यावसायिक, वाहतूकदार, पर्यटन व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच वाहनतळ ठेकेदाराकडून स्थानिकांना पार्किंग शुल्क आकारले जात असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला होता.

या समस्येबाबत स्थानिक व्यावसायिकांनी दोन दिवसांपूर्वी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने व्यावसायिकांनी आज मालवणात आलेल्या आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. यानंतर आमदार राणे यांनी स्वतः बंदर जेटी परिसराची पाहणी करून स्थानिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी मालवण मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर, नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा पर्यटन व्यावसायिक अन्वेषा आचरेकर, मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, हॉटेल व्यावसायिक संतोष शिरगांवकर आणि बाबा मुकादम यांनी स्थानिकांच्या समस्या मांडल्या. हे मार्ग वर्षानुवर्षे वाहतुकीसाठी वापरात असून ते बंद केल्यामुळे मत्स्य व्यवसाय, पर्यटन व्यवसाय आणि व्यापारी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

व्यावसायिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण बंदर जेटी परिसर वाहनतळाच्या ठेक्यात समाविष्ट करताना स्थानिकांच्या पारंपरिक वाहतुकीचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक मच्छिमार, मत्स्य व्यावसायिक आणि वाहतूकदारांना हा मार्ग खुला राहिला पाहिजे. स्थानिकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, यासाठी वाहनतळाच्या ठेक्यात आवश्यक बदल करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

बाजाराकडील तसेच सागर किनारा हॉटेलकडील बंद करण्यात आलेले मार्ग खुले करून वाहनतळातून बंदर जेटी रस्त्यापर्यंत स्थानिक वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही आमदार राणे यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून बंदर विभागाला आवश्यक निर्देश दिल्याने स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, बाबा परब, मनोज मेथर, हेमंत शिरगांवकर, परेश धुरी, हर्षल बांदेकर, मयु पारकर, रोहन आचरेकर यांच्यासह मत्स्य व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक आणि व्यापारी उपस्थित होते.

error: Content is protected !!