दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून घुमडेत भक्ती अन् दशावतारी कलेचा जागर

१८ ऑगस्टपासून विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

मालवण : घुमडे येथील श्री घुमडाई देवी मंदिरात श्रावणधारा कार्यक्रमांतर्गत यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि दशावतारी नाट्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भजन व दशावतारी नाट्य महोत्सव’ या उपक्रमातून १८ ऑगस्टपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत भाविकांना भक्तीमय वातावरणासोबतच दर्जेदार दशावतारी नाट्याची मेजवानी मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या पुरस्काराने तसेच घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या आयोजनातून हा महोत्सव होत आहे. भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर बुवा यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम व लघुरुद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘किमिच्छक व्रत’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर, कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत ‘दुर्गाष्टमी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजन सेवा होईल.

मंगळवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, मालक – देवेंद्र नाईक यांचा ‘कृष्ण!! ब्रह्मांडाचा धनी’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजन सेवा होणार आहे.

महोत्सवाची सांगता मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी होणार असून, सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता हेरंब दशावतार नाट्य मंडळ, मालक – पप्पू नांदोस्कर यांचा ‘इंद्रजित वध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग रंगणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन दत्ता सामंत, अध्यक्ष, घुमडे ग्रामस्थ मंडळ, घुमडे-मालवण यांनी केले आहे. या महोत्सवामुळे घुमडे परिसरात श्रावणातील भक्तीमय वातावरणासोबतच कोकणच्या समृद्ध दशावतारी लोककलेचा जागर होणार आहे.

error: Content is protected !!