
विकास गावकर यांना ‘सर्वोत्तम रिपोर्टर – कोकण’ पुरस्कार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मान
मालवण : सिंधुदुर्गच्या पत्रकारितेचा आवाज मुंबईच्या व्यासपीठावर दुमदुमला असून टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६’ अंतर्गत ‘सर्वोत्तम रिपोर्टर – कोकण’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकास गावकर यांचा सन्मान करण्यात आला. कोकणातील जनसामान्यांचे प्रश्न, स्थानिक घडामोडी आणि जनहिताचे विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान सिंधुदुर्गच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
मुक्तपीठच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्याला पत्रकारिता, साहित्य, न्यायव्यवस्था, अर्थशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व लेखक तुळशीदास भोईटे लिखित ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, अर्थतज्ज्ञ व IMF तसेच नियोजन आयोगाचे माजी सल्लागार, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार व नाटककार ज्ञानेश महाराव, विचारवंत, लेखक, कवी व कलाकार संजीव खांडेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे, ॲड. अनिता बाफना, राजेंद्र हुंजे, ॲड. जयशेष वाणी, नरेंद्र बंडबे, कबीर नाईकनवरे, रुशाली सारंग, शरयू यादव, राहुल रानाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणातील पत्रकारितेच्या कार्याची दखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता करताना स्थानिक प्रश्न, जनतेच्या समस्या, सामाजिक विषय तसेच विविध क्षेत्रातील घडामोडींना सातत्याने प्रसिद्धी देण्याचे काम विकास गावकर यांनी केले आहे. टीव्ही नाईन मराठीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विविध विषय राज्यस्तरावर पोहोचविण्यात त्यांच्या पत्रकारितेची भूमिका राहिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुक्तपीठने त्यांची ‘सर्वोत्तम रिपोर्टर – कोकण’ या पुरस्कारासाठी निवड केली.
या सोहळ्यात राज्यातील माध्यम क्षेत्रातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार, संपादक, अँकर, रिपोर्टर आणि तांत्रिक क्षेत्रातील प्रतिभावंतांचाही सन्मान करण्यात आला. यात सर्वोत्तम राष्ट्रीय अँकर व संपादक – डिजिटल साहिल जोशी, सर्वोत्तम राजकीय संपादक – प्रिंट मीडिया यदु जोशी, सर्वोत्तम संपादक टीव्ही व सर्वोत्तम अँकर – स्पेशल शो सरिता कौशिक, सर्वोत्तम अँकर विशाल परदेशी, सर्वोत्तम संवेदनशील अँकर प्रियंका लाठी, सर्वोत्तम आऊटपुट विभाग अजय सोनवणे, सर्वोत्तम इनपुट विभाग शिवाजी शिंदे, सर्वोत्तम लढवय्या पत्रकार मंदार गोंजारी, सर्वोत्तम रिपोर्टर – पश्चिम महाराष्ट्र रवींद्र कांबळे आणि सर्वोत्तम रिपोर्टर – कोकण विकास गावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
तसेच अनिल सारंगले, प्रशांत वराडकर, प्रवीण पाटील, संजय पिलगर, प्रणाली तळवणेकर, गजानन उमाटे, सुमीत पवार, संतोष पाटील आणि निखिल रोकडे यांच्यासह माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांचाही गौरव करण्यात आला. मुक्तपीठ टीममधील अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, सुश्रुषा जाधव आणि गौरव साळी यांचा ‘मुक्तपीठ टीम सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.







Subscribe to my channel






