गणेश चतुर्थी तोंडावर ; मात्र मालवणात नगरपालिकेचे नियोजन शून्य… !

ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते महेंद्र म्हाडगूत यांचा आरोप ; प्रभारी मुख्याधिकारी १५ दिवस मालवणात फिरकलेही नाहीत

मालवण | कुणाल मांजरेकर

गणेश चतुर्थी चार दिवसावर आली आहे. चतुर्थी निमित्त नगरपरिषदने नियोजन केल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात शहरात पालिकेमार्फत कोणतेही नियोजन केलेले दिसून येत नाही. प्रभारी मुख्याधिकारी मागील पंधरा दिवसापासून मालवण शहरात फिरकलेले सुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना मालवण शहराबाबत कोणतीही आस्था दिसून येत नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रवक्ते महेंद्र म्हाडगूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मालवण शहरातील दिवाबत्तीचे नियोजन १ ऑगस्ट पासून केलेले आहे. असे फक्त नियोजन बैठकीत सांगण्यात येत असले तरी सुद्धा नागरिक जेव्हा नगरपरिषदमध्ये दिवा बत्तीच्या तक्रारी घेऊन गेल्यावर तुम्हीच मनुष्य घेऊन स्वतः बसवून घ्या, असे दिवाबत्ती नियोजन कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात येते. दिवाबत्ती ठेकेदार मागील आठ दिवसापासून गायब आहे व त्यास नगरपरिषद कर्मचारी पाठीशी घालत आहेत. त्यामुळे रिकामी असलेल्या राजकीय सत्ताधारी कार्यकर्ता व पुढारी यांना काम मिळाले आहे.

शहरातील झाडी तोडण्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. तोडलेल्या झाडांचा पाला पाचोळा रस्त्यावर पडलेला आहे. पावसामुळे तो कुजल्याने रस्ते निसरडे झाल्यामुळे लोक चालताना पडण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असताना शहरातील घनकचरा उचलणाऱा ठेकेदार हाही घायाळ झालेला आहे. त्यामुळे कचरा उचलणारे कामगार गायब होण्याच्या मार्गावर आहेत. मालवण शहरातील कचरा उचलण्यासाठी शासन स्तरावरून दोन ट्रॅक्टर नगरपरिषदेस मोफत दिलेले असतानाही भंगारात देण्यालायक योग्य नसलेले ट्रॅक्टर नगरपरिषद भाड्याने घेऊन मालवण शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे व शहरातील पायवाटा ह्या अद्यापपर्यंत साफसफाई व खड्डे बुजवलेले नाहित. शेवटच्या दिवसापर्यंत नगरपरिषदेची कामाची लढाई चालू आहे. त्यामुळे फक्त नियोजन बैठका घ्यायच्या व प्रसिद्धी माध्यमांना चुकीची माहिती पुरवण्याचे काम नगरपरिषद कार्यालयाकडून केले जात आहे, असे महेंद्र म्हाडगुत यानी म्हटले आहे.

error: Content is protected !!