पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ; मार्च एंडपूर्वीच २८२ कोटींचा १००% निधी वितरित

नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा १०० टक्के पूर्ण करत, सर्व संबंधित विभागांना निधी वितरित करण्याच्या कामगिरीत सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथमस्थानी तर अमरावती द्वितीय स्थानी आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीमुळे राज्यात जिल्हा अव्वल ठरला आहे.

जिल्ह्यात विविध सरकारी विभागांच्या सुमारे १०० योजनांच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व योजनांना गती देण्यासाठी राज्य शासनाने २८२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष बाब म्हणजे, मार्च अखेर उजाडण्यापूर्वीच हा संपूर्ण निधी संबंधित विभागांना यशस्वीपणे वितरित करण्यात आला असून, यामुळे अनेक विकासकामे आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहेत.

जिल्ह्यातील विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध कामकाज करत निधी वितरणाची प्रक्रिया गतिमान ठेवली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विविध विभागांशी योग्य समन्वय साधत, निधी वेळेत वितरित होईल याची प्रभावी अंमलबजावणी केली. या संयुक्त प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने केवळ निधी वितरणातच नव्हे, तर विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतही आघाडी घेतली आहे. मार्च एंडपूर्वीच १०० टक्के निधी वितरित करण्याची ही ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही ती मार्गदर्शक ठरणार आहे.

error: Content is protected !!