वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती केल्यास मनसे रस्त्यावर उतरणार 

महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास आल्यास मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन

मालवण : महावितरणच्या स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांच्या मनात अद्यापही संभ्रम असताना ४८ तासात स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटीसा महावितरणने विद्युत ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्या आहेत. मात्र हे प्रकार अन्यायकारक असून वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर साठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसेचे तालुकाप्रमुख गॅरी अन्ननसिएशन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांवर जबरदस्ती होणार नाही, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली आहे. असे असताना ग्राहकांना मोबाईल वर नोटीसा बजावण्याची महावितरणची भूमिका हुकूमशाहीचे द्योतक आहे. त्यामुळे मनसे सर्वसामान्य नागरिकांसोबत आहे. कोणाही वीज ग्राहकाकडे जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर ८२७५३१५४५४, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन ८७९३६९१९०९ किंवा शहर अध्यक्ष सागर जाधव ९६७३६८३८८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!