सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात किरण उर्फ भैय्या सामंत यांची “एंट्री”
१५ ऑक्टोबरला पहिला दौरा जाहीर ; विकासात्मक प्रश्न हाताळणार
भैय्या सामंत यांच्या पहिल्याच दौऱ्यात कोणाला राजकीय धक्के मिळणार ? चर्चेला उधाण
मालवण : कुणाल मांजरेकर
राज्यातील सत्तांतरानंतर रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत ! मूळ शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडे आकर्षित करण्यामध्ये भैय्या सामंत यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून त्यांना लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आजवर पडद्यामागच्या खेळीत माहीर असलेले भैय्या सामंत आता अधिकृतपणे दौऱ्यावर येत असून येत्या १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात ते विकासात्मक प्रश्न हाताळणार असून पहिल्याच दौऱ्यात ते कोणाला राजकीय धक्के देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नेहमीच राजकीय पडद्याआड राहून सुत्रधाराची भूमिका आजवर पार पाडताना दिसून आले आहेत. आता तर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजीच्या दौऱ्यानिमित प्रथमच ते थेट राजकीय आखाड्यात उडी घेत आहेत. किरण सामंत यांच्या या पहिल्यावहिल्या राजकीय दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत.
१५ ऑक्टोबर रोजी किरण ऊर्फ भैय्याशेठ सामंत हे सकाळी १० वाजता देवगड शाखा येथे भेट देणार असून कार्यकर्त्यांशी संघटनावाढी बाबत चर्चा करणार आहेत. दुपारी ११ वाजता आचरा येथील राजन पांगे यांच्या घरी भेट देणार असून देवस्थान कमिटी चर्चा आणि चिरे – वाळू संघटना यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. दुपारी १२ वाजता आचरा येथील हॉटेल राणेशाही येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संघटनावाढी बाबत चर्चा करणार आहेत. तर दुपारी २ वाजता मालवण येथील हॉटेल रामेश्वर, सागरी महामार्ग येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संघटनावाढीबाबत संवाद साधणार आहेत, दुपारी ३ वाजता देवबाग संगम येथे भेट देऊन धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कुडाळ येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार असून सायंकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसने ते रत्नागिरीला रवाना होणार आहेत. त्यांच्या पहिल्या सिंधुदुर्ग दौऱ्या मुळे कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे.