भाजपातून उबाठात आलेल्या माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…


कोणावरही टीका करायची नाही ; शहरवासियांच्या इच्छेखातर निवडणूक रिंगणात : सौ. करलकर यांची प्रतिक्रिया : माजी आमदार वैभव नाईक यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मालवण : भाजपकडून नगराध्यक्ष पदा साठी डावलल्या गेल्याने नाराज होऊन ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार असले तरी सर्व उमेदवारांशी चर्चा करून करलकर यांना ही संधी देण्यात आली असल्याचे यावेळी ठाकरे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मला कोणावरही टीका करायची नाही, शहरवासियांच्या इच्छेखातर मी निवडणूक रिंगणात आल्याचे सौ. करलकर म्हणाल्या. तर माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, या निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासह जे उमेदवार देण्यात आले आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते एका तत्त्वाशी ठाम राहिलेले उमेदवार आहेत. एका तत्त्वाशी ठाम राहिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी शहरवासीयांनी उभे राहावे. ते तुम्हाला विश्वास देतील, पुढील पाच वर्षे मालवण पालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने पार पाडतील.काही लोक राज्यात सत्ता असल्याने मालवण पालिका ताब्यात देण्याची मागणी करत आहेत. परंतु मालवण पालिकेत आजही १०० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. हा निधी प्रामाणिकपणे खर्च केल्यास मालवण शहराचा निश्चितच कायापालट होईल, असे नाईक म्हणाले.
आजपर्यंत शहरात जी काही कामे झाली आहेत. यात पालिकेची इमारत, नळपाणी योजना, बस स्टँड ही सर्व कामे मी आमदार असताना सत्ता काळात झाली आहेत. परंतु गेल्या साडेतीन वर्षात सत्ताधाऱ्यांनी काय आणले. हा प्रश्न सर्वांनी विचारला पाहिजे. विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुडाळ-मालवण हाच रस्ता विकासाबद्दल सर्व सांगून जातो. शहरातील खड्डेमय रस्ते हाच विकास सांगून जातोय. शहराच्या नळपाणी योजनेचे काम वर्क ऑर्डर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला तरी अद्याप सुरू झालेले नाही. भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी आणूनही ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
सत्ताधाऱ्यांचे नाकर्तेपणाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, मालवण पालिकेला एक वर्ष मुख्याधिकारीच नाही अशी टीका त्यांनी केली. श्री. नाईक म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीसाठी जो चेहरा हवा तो अनुभवी असायला हवा. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांना कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. कारण त्यांनी नगरसेविका म्हणून चांगले काम केले आहे. त्या कोणताही डाग नसलेल्या उमेदवार असून सर्व लोकांना विश्वासात घेऊनच पालिकेचा कारभार हाकतील. मालवण पालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आल्यास जिल्हा नियोजन पालिकेचा फंड आणि पडून असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून आमचे प्रामाणिक उमेदवार शहराचा कायापालट निश्चितच चांगल्या पद्धतीने करतील. जाती-धर्म-पक्ष भेद विसरून आमचे उमेदवार काम करतील तसेच पालिकेच्या कारभारावर शहरवासीयांचाही अंकुश राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांनी यावेळी सांगितले की, मालवण पालिकेत नगरसेविका म्हणून १९ वर्षे नेतृत्व केले आणि भाजपची नगरसेविका म्हणूनही काम केले. ठाकरे शिवसेनेने मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. जनतेतून तू नगराध्यक्ष झाली पाहिजे, अशी शहरवासीयांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे मला या निवडणुकीत निश्चितच सहकार्य आणि मतदानरुपी आशीर्वाद मिळतील, असा विश्वास वाटतो. माझ्यासोबत जे नगरसेवक, नगरसेविका पदाचे उमेदवार आहेत. त्यांनाही निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
















Subscribe to my channel




