महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा घरोघरी प्रचारावर भर


मालवण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. तालुक्यातील आडवली-मालडी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला असून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली आहे. त्यांच्या ‘डोअर टू डोअर’ मोहिमेला गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आडवली-मालडी मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. या भागावर सोनाली घाडीगांवकर यांचे पती सुनील घाडीगांवकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघाने महायुतीला भरभरून मतदान केले होते, तोच इतिहास आता जिल्हा परिषदेतही पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रचारादरम्यान सोनाली घाडीगांवकर यांनी निरोम, मठबुद्रुक, बुधवळे, कुडोपी, श्रावण, रामगड, गोठणे, किर्लोस, असगणी, राठीवडे, घाडीवाडी, हिवाळे, शिरवंडे, असरोंडी आणि ओवळीये या सर्व गावांचा दौरा पूर्ण केला आहे. “महाविकास आघाडीच्या काळात रखडलेली विकासकामे मार्गी लावणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने विकासाची गती वाढवणे सोपे होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक दर्जा उंचावणे, प्रत्येक घराला शुद्ध पाणी आणि अखंडित वीजपुरवठा मिळवून देणे, शेती आणि दळणवळणासाठी अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, बचतगटांच्या माध्यमातून महिलांना तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे यावर आपला भर असेल असा विश्वास सोनाली घाडीगांवकर यांनी मतदारांना प्रचारादरम्यान दिला आहे.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. ही विकासाची गती कायम राखण्यासाठी सोनाली घाडीगांवकर यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. “आडवली-मालडीत केवळ महायुतीचाच विजय होणार,” असा ठाम विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
















Subscribe to my channel




