भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांबरोबरच पशुधनाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ; पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा

रेवतळे प्रभाग क्र. २ मधील महिलांनी लेखी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष

मालवण : शहरातील रेवतळे प्रभाग क्र. २ परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत ये-जा करणारी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार व पादचारी यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून हे भटके कुत्रे गुरांच्या लहान वासरांवर तसेच पाळीव जनावरांवर हल्ले करीत असल्याने पशुधनाच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. तरी नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील अमृता फाटक, वेदिका गोसावी यांच्यासह प्रभागातील महिलांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

हे निवेदन नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, याठिकाणच्या भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावणे, भुंकणे तसेच चावण्याचा प्रयत्न करणे अशा घटना वारंवार घडत आहेत. सागरी महामार्गावर सकाळच्या सत्रात जॉगिंगसाठी ज्येष्ठ व तरुण नागरीक मनात भिती ठेवून वावरत आहेत. याठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पालक आपल्या लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंताग्रस्त आहेत.

तसेच भटके कुत्रे टोळक्याने एकत्र येऊन गुरांच्या लहान वासरांवर तसेच इतर पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पशुधनाचे नुकसान होत असून शेतकरी व पशुपालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सागरी महामार्गावरही भटके कुत्रे अचानक रस्त्यावर येत असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांना कुत्र्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावावे किंवा वाहन वळवावे लागत असल्याने गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

तरी आपण सदर बाबीची गांभीर्याने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, पकडून नियमानुसार योग्य ठिकाणी स्थलांतर करणे तसेच नागरिकांच्या व पशुधनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. भविष्यात कोणतीही अनुचित घटना, अपघात अथवा जीवितहानी होऊ नये तसेच पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, वरील निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास भटक्या कुत्र्यांमुळे पशुहानी किंवा मनुष्य हानी झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार नगरपालिका राहिल याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अमृता फाटक, मीना फाटक, वेदिका गोसावी, मेधा मुरकर, दर्शना चव्हाण, प्राजक्ता हळदणकर, तारका चव्हाण, स्वाती बादेकर, मोहिनी हडकर, राखी हडकर, सीमा गावडे, दीपाली मांजरेकर, पूजा मांजरेकर, अपर्णा मडये यांच्यासह अन्य स्थानिक महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!