नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र ही डेडलाईन देखील हुकली असून आता मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम येत्या २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.


मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना विविध समस्यांबाबत एक सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत गडकरी यांनी महामार्गाचे उर्वरित रखडलेले काम २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे होणारी तीव्र वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणींकडे हुसेन दलवाई यांनी नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. एकीकडे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) खारपाडा येथे पहिला टोल नाका सुरू करून टोल वसुली सुरू केली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या टोल वसुलीला ‘प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली लूट’ म्हणून संबोधले आहे. “जेव्हा रस्ताच पूर्णपणे सुरक्षित आणि तयार नाही, तर मग टोल कोणत्या गोष्टीचा वसूल केला जात आहे?” असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत.







Subscribe to my channel






