मुथूट फिनकॉर्प सोनेतारण प्रकरण : पीडितांचे शिष्टमंडळ डॉ. भागवत कराड यांच्या भेटीला

रविकिरण तोरसकर यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर पाठपुरावा; RBIमार्फत सखोल चौकशीसह पीडितांचे सोने परत मिळवून देण्याची मागणी

मालवण : मालवण येथील मुथूट फिनकॉर्प शाखेशी संबंधित कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून, १२० हून अधिक मच्छीमार व स्थानिक महिलांचे अंदाजे ९ किलो सोने आणि सुमारे ६ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पीडित महिला आणि ‘सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंच’च्या शिष्टमंडळाने रविकिरण तोरसकर यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने प्रकरणाची सविस्तर माहिती देत, पीडितांच्या म्हणण्यानुसार अडकलेले सोने, संबंधित आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, अनेक कुटुंबांनी वर्षानुवर्षे कष्ट करून जमा केलेले स्त्रीधन व मौल्यवान दागिने या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे प्रत्येक पीडितेच्या सोन्याचा, कर्ज व्यवहाराचा आणि आर्थिक व्यवहाराचा स्वतंत्र मागोवा घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

हे प्रकरण केवळ मालवण शाखेपुरते मर्यादित न ठेवता, Muthoot Fincorpच्या इतर शाखांमध्येही अशाच स्वरूपाच्या तक्रारी किंवा व्यवहार झाले आहेत का, याची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासाठी संबंधित नियामक आणि केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून KYC, ग्राहकांची संमती, OTP/e-consent, Gold Loan documents, multiple loan creation/closure, loan disbursement, money trail, gold trail, gold valuation तसेच custody records यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

“पीडितांचे मूळ सोने परत मिळणे हीच प्रमुख मागणी”

पीडितांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, त्यांची मागणी केवळ दोषींवर कारवाई करण्यापुरती मर्यादित नाही. संबंधित प्रकरणाची कायदेशीर चौकशी होऊन पीडित महिलांचे मूळ दागिने व स्त्रीधन सुरक्षित राहावे आणि कायदेशीर प्रक्रियेतून ते त्यांना परत मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात RBIकडे regulatory representation करण्यासह आवश्यक त्या केंद्रीय स्तरावरील यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

‘सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंच’च्या वतीने, रविकिरण तोरसकर यांच्यासह या शिष्टमंडळात रुपेश प्रभू, दाजी जोशी, कविता मोंडकर, माधुरी प्रभू, सौ. पूजा सरकारे, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध बाबींची दखल घेत डॉ. भागवत कराड यांनी प्रकरणाचा सखोल अभ्यास करून RBI तसेच संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

पीडित महिलांचे अडकलेले सोने सुरक्षित राहावे आणि कायदेशीर प्रक्रियेतून त्यांना त्यांचे हक्काचे दागिने परत मिळावेत, यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन मिळाल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले. या भेटीनंतर पीडित महिलांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. “आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही; मात्र आमचे स्त्रीधन आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका पीडितांनी व्यक्त केली. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि प्रत्येक पीडितेचे मूळ स्त्रीधन सुरक्षितपणे परत मिळावे, यासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार शिष्टमंडळाने व्यक्त केला.

error: Content is protected !!