दुष्काळाचे संकट गडद; रत्नागिरीत खा. नारायण राणेंनी दिला ‘ॲक्शन प्लॅन’चा मंत्र!

पाणीटंचाई, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आतापासून नियोजन करण्याच्या लोकप्रतिनिधीना सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस आणि दूरदृष्टीने नियोजन करावे, असे मार्गदर्शन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त रत्नागिरीत आलेल्या खा. नारायण राणे यांची रत्नागिरीतील प्रमुख लोकप्रतिनिधींनी शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मात्र, केवळ घोषित तालुक्यांपुरता विचार न करता संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईसाठी कृती आराखडा तयार करावा, अशी भूमिका खा. राणे यांनी मांडली.

पाण्याचे उपलब्ध स्रोत, त्यांचे संवर्धन, भविष्यातील पाण्याची गरज आणि नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक पर्यायी व्यवस्था याबाबत त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय केला. संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संकटाची शक्यता लक्षात घेऊन आधीच नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच भविष्यातील अन्नधान्य उपलब्धता आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे नियोजन करण्याची गरजही खा. राणे यांनी अधोरेखित केली. देशांतर्गत दुष्काळी परिस्थितीबरोबरच देशाबाहेरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणामही भविष्यात अन्नधान्य, पाणी आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितींचा व्यापक विचार करून राज्य आणि केंद्राने दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याला सामोरे जावे लागू नये, यासाठी साठवणूक, पुरवठा व्यवस्था आणि प्रशासनाची पूर्वतयारी मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन खा. राणे यांनी केले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!