माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सुनेचे अघोरी कृत्याचे आरोप

राऊत पिता पुत्रासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल ; सिंधुदुर्गात खळबळ

सिंधुदुर्ग : ठाकरे शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर विनायक राऊत यांच्या सुनेने मानसिक आणि शारीरिक छळ करणे, मांत्रिक, बुवाबाबांकडे नेऊन जादुटोण्यासारखी कृत्ये केल्याचा गंभीर आरोप केला असून राऊत पिता पुत्रासह त्यांच्या कुटुंबा विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी त्यांच्याविरोधात ठाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमधून अनेक गंभीर आरोप केले आहेत. राऊत कुटुंबीयांनी आपली फसवणूक केली, मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच मांत्रिक, बुवाबाबांकडे नेऊन जादुटोण्यासारखी कृत्ये केली. बळजबरीने गोमुत्र प्राशन करायला लावले, असे गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहेत.

गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. गितेश राऊत हे शरीरसंबंध ठेवणं टाळायचे. लग्नानंतर उटी येथे हनिमूनसाठी गेले असताना गितेश राऊत यांनी शरीरसंबंध ठेवणे टाळले. आपण फक्त आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊनच शरीरसंबंध प्रस्थापित करू शकतो. भारतात शरीरसंबंध प्रस्थापित करायला कम्फर्टेबल वाटत नाही, असे गितेश राऊत यांनी सांगितले. मात्र २०१८ मध्ये आम्ही ऑस्ट्रेलिया येथे गेलो असतानाही गितेश राऊत यांनी जवळ येणे टाळले. तसेच मी जवळीस साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला शिवीगाळ आणि मारहाण केली. कधीही भांडण झाल्यास गितेश राऊत हे वेळ, काळ, स्थळ न पाहता वाद घालायचे. घालूनपाडून बोलायचे. अपमानित करायचे, असेही गिरिजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच लग्न ठरवताना मुंबईत वाकोला येथे स्वत:चा बंगला असल्याचे तसेच एक आलिशान फ्लॅट आहे असेही सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात लग्न झाल्यानंतर आमची वरात ही वाकोला येथील झोपडपट्टीतील निवासस्थानी नेण्यात आली, असा आरोपही गिरिजा राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत आणि कुटुंबीयांनी जादुटोण्यासारख्या गोष्टीही केल्याचा आरोप सुनेने केला आहे. गितेश राऊत यांचं नपुंसकत्व लपवण्यासाठी राऊत कुटुंबीयांनी जादुटोण्यासारख्या गोष्टीचा आधार घेतला. आपल्याला काही बाबाबुवांकडे नेऊन अघोरी कृत्ये केली. डोक्यावरचे केस काढले. तिथे लिंबू कापणे, कणकेच्या बाहुल्या तयार करणे, असले प्रकार केले. तसेच बळजबरीने गोमुत्र प्राशन करायला लावले, असे गिरिजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून तीन भोंदू बाबांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत हे ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघांचे माजी खासदार असून उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असून त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!