घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको

युरोपातील अस्थिरतेचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा

‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात घुसखोरी, अंतर्गत सुरक्षा आणि मतदार यादी शुद्धीकरणावर परखड भूमिका

‘रिजीम चेंज’ची भाषा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान नाकारण्याची भाषा!

कणकवली : युरोपातील प्रगत देशांमध्ये महागाई, शिक्षण आणि बेकायदा घुसखोरीच्या प्रश्नांवरून निर्माण होणारी सामाजिक अस्थिरता भारतासाठीही चिंतनाचा विषय आहे. देशाची लोकशाही, अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय अस्मिता जपायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. मतदार यादीतील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची नावे वगळण्यासाठी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया समजून घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युरोपमधील सामाजिक अस्थिरता, बेकायदा घुसखोरी, देशाची अंतर्गत सुरक्षा, मतदार यादीचे शुद्धीकरण आणि लोकशाही व्यवस्थेसमोरील आव्हाने यावर सविस्तर भूमिका मांडली. या विषयांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता एक भारतीय नागरिक म्हणून गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युरोपमधील घडामोडींचा संदर्भ देताना मंत्री राणे म्हणाले की, नेदरलँडसारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशातही महागाई आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरून आंदोलने होत आहेत. जर्मनी, फ्रान्स आणि इटलीसह युरोपातील अनेक देशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशांमध्येही अशी परिस्थिती का निर्माण होत आहे, याचा भारतीयांनी विचार करण्याची गरज आहे. सुपर मार्केटमधील फ्रीजरवर सायबर हल्ले करून खाद्यपदार्थ खराब करण्यासारख्या घटनांमधून त्या देशांची शांतता आणि व्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा घटनांमधून धडा घेत भारताने वेळीच सावध होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा मुद्दा उपस्थित करताना राणे म्हणाले की, रोजगाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणे आणि त्यानंतर स्थानिक व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणे, ही गंभीर बाब आहे. भारतात येऊन येथील व्यवस्थेवरच हक्क सांगण्याची प्रवृत्ती स्वीकारता येणार नाही. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा भारतीय नागरिकांचा आहे. परदेशातील नागरिकांनी भारतात येऊन आपले लोकप्रतिनिधी निवडावेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पश्चिम बंगालमधील मतदार यादी पडताळणीचा संदर्भ देत त्यांनी मतदार यादीत सुमारे ८० लाख घुसखोर असल्याचा दावा केला. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेचे महत्त्व प्रत्येक नागरिकाने समजून घेतले पाहिजे. आपल्या गावातील, जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशातील पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत कायम राहिली पाहिजेत, तर अनधिकृतपणे समाविष्ट झालेली नावे नियमानुसार वगळली गेली पाहिजेत. पात्र भारतीय मतदारांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाही व्यवस्थेत सरकार बदलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे; मात्र आंदोलनांच्या नावाखाली न्यायव्यवस्था आणि लोकशाही संस्थांनाच नाकारणे, तसेच संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न करणे, ही गंभीर बाब आहे. ‘रिजीम चेंज’च्या नावाखाली देशातील विद्यमान व्यवस्था बदलण्याची भाषा केली जात आहे. ही भूमिका म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान करण्यासारखी आहे, असे परखड मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.

बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे आणि बौद्ध धर्मीयांची धार्मिक स्थळे पाडण्याच्या तसेच अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. धर्माच्या आधारावर नागरिकांना लक्ष्य केले जात असेल, तर अशा घटनांकडे केवळ शेजारील देशातील घडामोडी म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने जागरूक राहावे. अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजप हा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष असून, देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर समाजातील बुद्धिजीवी आणि जागरूक नागरिकांमध्ये चर्चा व्हावी, या उद्देशाने अशा चिंतन संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करताना त्यांनी देशाच्या विकासापेक्षा देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला.

बुद्धिजीवी वर्गाने भाजपची भूमिका आहे म्हणून नव्हे, तर देशाची सुरक्षा, लोकशाही आणि भविष्यातील स्थैर्य या व्यापक दृष्टिकोनातून या विषयांचा विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात प्रत्येक भारतीयाने योगदान द्यावे. देशाची लोकशाही, राष्ट्रीय अस्मिता आणि सुरक्षित भविष्य जपण्यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!