स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तहसील व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई


मालवण : शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास तहसिलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या सहा डंपरवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
मालवण शहराला लागून असलेल्या सागरी महामार्गावर हॉटेल आराध्य नजीक २६ डिसेंबर रोजी रात्री १२.०० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्यान ६ डंपरमधून अनधिकृत गौणखनिज (वाळू) ची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ यांना मिळताच सदरचे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर व इतर स्थानिक ग्रामस्थांनी अडविले व सदरची बाब तात्काळ मालवण पोलीस ठाण्यास कळवण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मालवण यांचे पथकामार्फत डंपरची तपासणी केली असता वाहनामध्ये वाळु आढळून आली. सध्या वाळु वाहतुक करण्याची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. अनधिकृतपणे वाळुची चोरी करण्याचे हेतुने वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले. सदरच्या वाहनात अनधिकृत गौण खनिज (वाळु) असल्याने त्याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक मालवण यांनी तहसिलदार मालवण यांना दिली. त्यानंतर तहसिलदार मालवण यांच्या सूचनांनुसार घटनास्थळी महसूल पथक उपस्थित झाले. त्यानंतर सदरहू डंपर पोलिस निरीक्षक मालवण यांचे ताब्यात देण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी तहसिलदार कार्यालय मालवण यांच्या आवारात लावण्यात आले आहेत.

Subscribe to my channel




