
खा. नारायण राणे यांच्याकडून कुडाळ, कणकवली, मालवण, देवगडसह अन्य तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
मालवण | कुणाल मांजरेकर
कोकणातील सर्वांचे लाडके दादा अर्थात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. वर वर कडक स्वभावाचे दादा कार्यकर्त्यांसाठी आतून फणसासारखे गोड आहेत. कार्यकर्त्यांवरील दादांच्या प्रेमाचा प्रत्यय बुधवारी दिसून आला. दोन महिन्याच्या आजारपणातून व्यवस्थित बरे वाटून जिल्ह्यात दाखल झालेल्या दादांना आजचा दिवस फावला वेळ मिळाल्याने त्यांनी पीए ला बोलावून अचानक जिल्ह्यातील अन्य तालुक्याना भेटी देत कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कुडाळ, कणकवली, देवगड, मालवणसह वेळ मिळेल तसा अन्य तालुक्याना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी मालवणात कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील अन्य तालुक्याना भेटी देतानाच मालवण येथील भाजप कार्यालय आणि महायुतीच्या कार्यालयास खासदार नारायण राणे सदिच्छा भेट दिली. महायुतीच्या कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी खा. राणे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, उमेश नेरुरकर, राजू बिडये यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, विलास हडकर, पंकज सादये, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, महानंदा खानोलकर, क्षमा हडकर, दर्शना कासवकर, मिलिंद कुलकर्णी, अमृता फाटक, अशोक तोडणकर, उपसभापती घनश्याम झाड, केदार झाड यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे म्हणाले, राजकारणात तब्बल ६० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असताना आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांसारखी सर्वोच्च पदे भूषवूनही मी स्वतःला नेहमीच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा सेवक मानत आलो आहे. पदाचा कधीही गर्व न बाळगता सातत्याने लोकांची सेवा करत राहा, जनतेचे प्रेम नक्कीच मिळेल,” असा मोलाचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. मालवण हा आपल्यासाठी नेहमीच ‘शुभ’ मतदारसंघ राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगत कार्यकर्त्यांना लोकसेवेचा वसा चालू ठेवण्याचे आवाहन केले. मालवणात आल्यावर मला प्रेरणा, ऊर्जा, प्रोत्साहन मिळते अशी माझी भावना आहे. या भावनेतून मी आज सदिच्छा भेट दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. यादृष्टीनेच मी राजकारणात सक्रिय राहिलो आहे. माझे राजकारणातील हे दहावे पद आहे. आमदार झालो, सभागृहात गेलो, अनेक मोठी पदे मिळाली, पण मी नेहमी सरळ आणि साध्या मार्गाने चालत राहिलो. लोकांची मदत करणे आणि सहकार्य करणे हीच माझी कार्यपद्धती असून, माझ्या डिक्शनरीत ‘नाही’ हा शब्दच नाही.
कार्यकर्त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना राणे यांनी आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांचे कौतुक केले. निलेश राणे, नितेश राणे आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते सर्वांसमोर आहे. मागच्या अधिवेशनात निलेश राणे यांनी केलेली भाषणे बघा. अभ्यास केला की आपल्याला कामाची दिशा मिळते आणि माणुसकी प्राप्त होते. कार्यकर्त्यांनीही संयम आणि अभ्यासू वृत्ती अंगी बाळगली पाहिजे, असे राणे म्हणाले.
पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काळात आमदार, खासदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधीही हाक मारा, तुमच्या मदतीला मी तत्पर असेन, अशी ग्वाही देत खासदार राणे यांनी कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







Subscribe to my channel






