धुरीवाडा सेवांगण परिसरात वृक्षारोपण ; अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मालवण : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब मालवणच्या वतीने मंगळवारी मालवण धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कडुलिंबाची चार आणि आवळ्याचे एक, अशी एकूण पाच रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीसोबतच लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांच्यासह सदस्य रुजारिओ पिंटो, उमेश शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शांती पटेल, रूपा कांदळकर, विजेता मेथर आणि बागवे काका उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपणातून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ असा सकारात्मक संदेश देण्यात आला.