मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : महाविकास आघाडी पॅनल परिवर्तनासाठी सज्ज

बाळू अंधारी यांचा विश्वास ; महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टिका करताना महाविकास आघाडी संस्था आणि कर्मचारी यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास बाळू अंधारी यांनी व्यक्त केला आहे.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी संचालक मनोज लुडबे, मनोज राऊत, सुभाष तळवडेकर हे पुन्हा महाविकास आघाडीतून आपले नशिब अजमावत आहेत. जिल्हा बँक संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी हेही या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. माजी नगरसेविका निना मुंबरकर याही नगरपालिका राजकारणातून आता सहकार क्षेत्रात आपली दावेदारी निश्चीत करण्यासाठी सज्ज आहेत. माजी सरपंच चंदन पांगे आणि साक्षी लुडबे याही निवडूक रिंगणात आहेत. अंधारी हे जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे संस्थापक आहेत. आटक हे सहकारातील शासकीय नोकरीतून आता थेट सहकारात काम करण्यासाठी सज्ज आहेत. सहकार अनेक वर्षे काम केलेले आणि अनेक संस्था उभ्या केलेल्या व्यक्तींचा महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये भरणा असल्याने या पॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कामगारांचे हित जोपासणार : बाळू अंधारी

खरेदी विक्री संघामध्ये काम करणारे कामगार आणि संस्थेवर विश्वास ठेवून असलेल्या सभासदांच्या हितासाठी आमचे पॅनेल राहणार आहे. आजपर्यंत संस्थेतील अनेक वादातील गोष्टींवर आमच्यातील माजी संचालकांनी आवाज उठविला होता. मात्र सत्ताधारी नसल्याने या संचालकांच्या सूचनांकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे. आता सभासदांनी विश्वास दाखविला तर परिवर्तन निश्चीत होणार असून सध्या प्रचारात फिरताना सर्वत्र मिळत असलेला प्रतिसाद पाहून यावेळी महाविकास आघाडीची सत्ता खरेदी विक्री संघावर निश्चीत येईल असा विश्वास श्री. अंधारी यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!