आरोग्य सभापतींनी घेतलं मनावर ; भल्या सकाळीच नगरपालिकेत धडक

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा घेतला आढावा ; अनेकांची भंबेरी

स्वच्छता निरीक्षक कधी मनावर घेणार ? उपस्थित होतोय सवाल

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदाचा काटेरी मुकुट परिधान केल्यानंतर झालेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आरोग्य व स्वच्छता विभागालाच धारेवर धरल्याने या विभागाचा कारभार सुधारण्याचे फार मोठे आव्हान सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्यावर आले आहे. त्यामुळे त्या अलर्ट मोडवर आल्या असून बुधवारी भल्या सकाळीच त्यांनी नगरपालिकेत दाखल होत अनेकांना धक्का दिला. यावेळी स्वच्छता विभाग व कर्मचाऱ्यांच्या त्यांनी आढावा घेतला. आरोग्य सभापती स्वतः सकाळी पालिकेत दाखल झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

दरम्यान, आरोग्य सभापतींनी स्वतः ची जबाबदारी ओळखत हा विभाग सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले असताना स्वच्छता निरीक्षक मात्र अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे सफाई कामगारांवर वचक कुणाचा राहणार ? असा प्रश्न निर्माण झाला असून स्वच्छता निरीक्षकांनी देखील मनावर घेऊन शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.

शहर विकासात आरोग्य व स्वच्छता विभागाची फार मोठी जबाबदारी आहे. या विभागाच्या कारभारावर शहराचे भवितव्य अवलंबून असून आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका तथा गट नेत्या सौ. पूनम चव्हाण यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. मागील चार वर्षे पालिकेवर प्रशासकीय कारभार असल्याने प्रशासकाच्या राजवटीत अनेक कर्मचारी सुस्तावल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत नगरपालिकेत नवीन बॉडी अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. या सर्वात कळीचा मुद्दा ठरला तो आरोग्य व स्वच्छता विभाग… ! या विभागाच्या कामकाजावर स्वतः आरोग्य सभापतींसह अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त करत स्वच्छता निरीक्षकांना फैलावर घेतले. यावेळी काहींनी स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. मात्र आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी यात हस्तक्षेप करत आताच आपण ह्या विभागाचे सभापती पद हाती घेतले असून ह्या विभागाला सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

या पार्श्वभूमीवर स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्यांनी आज सकाळीच नगरपालिकेत धडक देत कर्मचारी वेळेवर येतात का ? याची स्वतः पाहणी केली. यावेळी काही लेट लतीफ कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. काहींनी तर सभापती आल्याचे पाहून नगरपालिका कार्यालयात न येता बाहेरूनच कामावर जाण्यासाठी पळ काढला. तर काहींची सभापतींनी झाडाझडती घेतली. यानंतर सभापतींनी कर्मचाऱ्यांसह मच्छिमार्केट किनाऱ्याला भेट देऊन तेथील स्वच्छतेचा आढावा घेतला. आपण यानंतर देखील पालिकेला आकस्मिक भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेणार असून कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणार असल्याचे त्या म्हणाल्या.

error: Content is protected !!