मालवणची नारळी पौर्णिमा … उत्साह तोच… पण जबाबदारीचेही भान !
कोरोनाच्या सावटाखाली मालवणात शिवकालीन नारळी पौर्णिमा साजरी
व्यापाऱ्यांसह सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहू देत ; व्यापाऱ्यांचे सागराचरणी साकडे
मालवण : शिवकालीन परंपरा लाभलेला मालवण येथील नारळी पौर्णिमा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा जोपासत दरवर्षी हजारो नागरिक दरवर्षी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवितात. मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या सावटामुळे जबाबदारीचे भान राखत अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. मालवण शहर कोरोनमुक्त होऊ देत आणि व्यापाऱ्यांसह सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहू देत असे साकडे यावेळी व्यापारी बांधवानी सागराला घातले. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मानाचा नारळ सागराला अर्पण झाल्यानंतर व्यापारी संघाचा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. त्यानंतर शेकडो मालवण वासियांनी आपापले नारळ समुद्राला वाहिले.
मालवण च्या नारळी पौर्णिमा सणाला शिवकालीन परंपरा आहे. शिवकालीन परंपरेनुसार सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात देवस्थानच्या सेवेकऱ्यांना मानाचा नारळ पुजारी सयाजी सकपाळ यानी दिला. त्यानंतर मंदिरात गाऱ्हाणे झाल्यानंतर शिवराजेश्वर मंदिरातुन सोन्याचा मुलामा लावलेला नारळ ढोलताशे आणि नौबतीसह किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या किनारी आणून त्या श्रीफळाचे पुजन करण्यात आले आणि त्यानंतर हा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. या मानाचा नारळ सागराला अर्पण झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते सोनेरी मुलामा दिलेले श्रीफळ (नारळ) विधिवत पूजा करून सागराला अर्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक सावंत, प्रमोद ओरसकर, रवी तळाशिलकर, नितीन वाळके, नितीन तायशेटये, विजय केनवडेकर, जॉन नरोन्हा, अरुण दलाल, परशुराम पाटकर , राजू नेरुरकर, गणेश प्रभुलीकर, विरेश मंत्री, राजाराम केणी, उमेश शिरोडकर, हनुमंत पाटकर, स्वप्नील अंधारी, विनायक सापळे, नीरज सापळे, कुलराज बांदेकर, हर्षल बांदेकर, विजय नेमळेकर यांच्यासह अन्य व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाचे संकट लवकर दूर करण्याचे साकडे यावेळी सागराला घालण्यात आले. पोलीस निरीक्षक एस. एस ओटवणेकर यांनीही श्रीफळ पूजन करून सागराला अर्पण केले. मच्छिमार बांधवांच्या वतीनेही किनारपट्टीवरून सागराला श्रीफळ अर्पण करत नव्या मासेमारी हंगामाचे साकडे दर्या राजाला घालण्यात आले.